esakal | दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूचा भाव वाढला; दादर, परळमध्ये ग्राहकांची झुंबड
sakal

बोलून बातमी शोधा

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूचा भाव वाढला; दादर, परळमध्ये ग्राहकांची झुंबड

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांची, तोरणांची तसेच आपट्याच्या पानांची खरेदी करण्यासाठी परळ आणि दादरच्या फूल मार्केटमध्ये ग्राहकांनी आज मोठी गर्दी केली.

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूचा भाव वाढला; दादर, परळमध्ये ग्राहकांची झुंबड

sakal_logo
By
भारती बारस्कर

शिवडी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांची, तोरणांची तसेच आपट्याच्या पानांची खरेदी करण्यासाठी परळ आणि दादरच्या फूल मार्केटमध्ये ग्राहकांनी आज मोठी गर्दी केली. अवकाळी पाऊस आणि कोरोना संकटामुळे पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव वाढले असून 60 ते 80 रुपये किलो दराने मिळणारा झेंडू यंदा 120 ते 160 रुपये किलोने मिळत आहे. 

केडीएमसीच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांचा वेग थंडावला! लोकप्रतिनिधींची नाराजी

तर तयार तोरण 60 ते 80 रुपये प्रति मीटरने विक्री होत असल्याचे विक्रेते समीर परब यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दसऱ्यानिमित्त घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत आखला जातो. अनेक जण मिठाईला पसंत देतात. त्यामुळे यंदा मिठाई विक्रीही तेजीत असून खरेदीसाठी ग्राहकांच्या लांब रांगा दुकानाबाहेर दिसत आहेत. दादर पश्‍चिम स्थानकालगत असलेल्या फूल मार्केटमध्ये झेंडूचा भाव 120 ते 160 रुपयांपर्यंत पोहोचला असून शेवंती 160 ते 180 रुपये, लहान झेंडू 90 ते 110 रुपये, गुलछडी 370 ते 400 रुपये प्रति किलो आहे. तसेच तयार हार 10 रुपयांनी महागले असून एका झेंडूच्या तोरणाची किंमत प्रतिमिटर 60 ते 80 रुपयांपर्यंत आहे. सणासुदीच्या दिवसांव्यतिरिक्त सरासरी 60 रुपये किलो दराने झेंडूची विक्री होते; तर आंब्याच्या पानांची व आपट्याच्या पानाच्या एका जुडीची किंमत 10 ते 20 रुपये इतकी असल्याचे येथील फूलविक्रेते दत्तात्रय काकडे यांनी सांगितले. 

ऑनलाईनवर विक्रीही तेजीत 
दसऱ्याच्या मुहूर्तावर नवे कपडे, वाहन, सोने, टीव्ही, स्मार्टफोन तसेच इत्यादी इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांत वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे; तर ऑनलाईन व मॉल्समध्येही आकर्षक सवलती दिल्याने ग्राहक येथे आकर्षित होत आहे. 

'पोलिस कर्मचारी नाही आता पोलिस अंमलदार म्हणा'; महासंचालकांचे आदेश

सोन्याचा भाव वाढणार 
सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा 50 हजार रुपये इतका आहे. दरम्यान, दसऱ्यानंतर लगेच दिवाळी येत असल्याने सोन्याचे भाव अजून वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे; तर चारचाकी व दुचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केली असून अनेक जण दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी केलेली वाहने घेण्यासाठी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी करणार असल्याचे शोरूम मालकांनी सांगितले आहे. 

Marigold prices rose on the eve of Dussehra Customers throng Dadar Paral

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )