केडीएमसीच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांचा वेग थंडावला! लोकप्रतिनिधींची नाराजी

केडीएमसीच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांचा वेग थंडावला! लोकप्रतिनिधींची नाराजी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या "स्मार्ट सिटी' योजनेतील कामांचा वेग थंडावल्याने लोकप्रतिनिधींनी आढावा बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली. कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी महामंडळाच्या कामाचा आढावा घेणारी एक बैठक आज सर्वोदय मॉल येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीला भिवंडीचे खासदार कपिल पाटील, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्‍वनाथ भोईर, रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड तसेच राजू पाटील उपस्थित होते.

पालिका क्षेत्राच्या भौगोलिक रचनेचा विचार करता या प्रकल्पामध्ये शहरातील प्रमुख रस्ते तसेच इतर प्राथमिक सुविधांना प्राधान्य देऊन शहराचा कायापालट करण्याची आवश्‍यकता होती; मात्र पालिका प्रशासन यात अपयशी ठरल्याची टीका भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी केली. 120 कोटी रुपये खर्च करून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत; मात्र शहरात प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

केंद्र सरकारने पालिका क्षेत्रात विविध विकासकामांसाठी 196 कोटी रुपयांचा निधी दिला आहे; मात्र ही कामे करताना केंद्र सरकारच्या नावाचा उल्लेख केला जात नसल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याचे निदर्शनास आणून या कामांसाठी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे निधीची मागणी करणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. 

स्मार्ट सिटी प्रकल्पातील योजनांची अंमलबजावणी, त्यांची कल्पकता यावर आधारित राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या पालिकेच्या विविध योजना अधिक गतीने पुढे नेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. फेब्रुवारी 2020 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर या कामांना गती देण्याचा प्रयत्न केल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी या वेळी सांगितले. या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात सल्लागार नेमण्यातील अडचणींमुळे विलंब झाल्याची कबुलीही आयुक्तांनी या वेळी दिली.

मागील काही काळात या प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या नागरी समितीच्या तीन बैठका आयुक्तांनी घेतल्या आहेत. सध्या शहरातील पाच प्रकल्प अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. तीन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला असून ते लवकरच संचालकांसमोर मांडले जाणार आहेत, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली. कोरोना संकटकाळात पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी महामारी नियंत्रणाच्या कामात व्यस्त होते; मात्र मागील काही दिवसांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाकडे पालिका प्रशासनाने विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. 

स्मार्ट सिटी दृष्टिक्षेपात... 

  • काळा तलाव, आयटीएमएस प्रकल्प अंतिम टप्प्यात 
  • महत्त्वाकांक्षी रेल्वे स्थानक परिसर विकास प्रकल्प कार्यादेश देण्याच्या प्रक्रियेत 
  • शहरात एलईडी दिवे बसवण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात 

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com