ऑनलाईन मास्क खरेदी करताय.?..थांबा...प्रथम ही बातमी वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

सरकारी व खासगी रुग्णालयांची फसवणूक झाल्याची शक्‍यता 

नवी मुंबई  : एन-95 मास्क व इतर सुरक्षा उपकरणे विक्री करण्याच्या बहाण्याने ऑनलाईन गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. तळोजा एमआयडीसीतील कंपनीमार्फत सदरचे साहित्य विक्री करण्यात येत असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात येत होती. या टोळीने देशभरातील अनेक सरकारी व खासगी रुग्णालयांना ऑनलाईन गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. 

हेही वाचा...अमृतांजन पूल पाडण्यास सुरुवात 

एखाद्या रुग्णालयाने एन-95 मास्क व इतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणे व साहित्याची खरेदी करण्याची तयारी दर्शविल्यास अशा रुग्णालयांना या टोळीतील सदस्य बॅंकेचे खाते क्रमांक देऊन त्यात ऑनलाईन पैसे जमा करण्यास सांगत. त्यानंतर ही टोळी त्यांना साहित्य न पाठविता त्यांची फसवणूक करत असे. 
या टोळीने 2 एप्रिल रोजी वॉल्टर जॉन नामक व्यक्तीला संपर्क साधून त्यांना मास्क व इतर साहित्य पाठवण्याचे आश्‍वासन देऊन त्यांच्याकडून ऑनलाईन 7 हजार 500 रुपये स्वीकारले होते. मात्र त्यांना मास्क व इतर साहित्य न मिळाल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी तळोजा येथील व्हिनस सेफ्टी कंपनीला संपर्क साधल्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आला. अशाच पद्धतीने या टोळीने जम्मू काश्‍मीर येथील स्वरा रुग्णालयामध्ये संपर्क साधून त्यांना मास्क व इतर साहित्य विकण्याचा बहाणा करून त्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सदर रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी व्हिनस सेफ्टी कंपनीला संपर्क साधून खातरजमा केल्याने त्यांची फसवणूक टळली आहे. 

हेही वाचा... आठ हजार पोलिसांचे सुटीसाठी अर्ज 

दरम्यान, या टोळीने व्हिनस सेफ्टी प्रा. लि. या कंपनीच्या नावाने देशभरातील अनेक हॉस्पिटल व व्यक्तींना अशाच पद्धतीने ऑनलाईन गंडा घातला असण्याची शक्‍यता असल्याने सदर कंपनीचे प्रॉडक्‍शन मॅनेजर महेंद्र घाग यांनी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील टोळीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mask Online Fraud for Sale