परदेशात वापरलेले मास्क भिवंडीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

चीनमध्ये करोना विषाणूने थैमान घातले असताना भारतात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. भिवंडी तालुक्‍यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार, इलेक्‍ट्रॉनिक मालासह परदेशात वापरलेले मास्कसुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहेत.

भिवंडी ः चीनमध्ये करोना विषाणूने थैमान घातले असताना भारतात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. भिवंडी तालुक्‍यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार, इलेक्‍ट्रॉनिक मालासह परदेशात वापरलेले मास्कसुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहेत. वापरलेले हे मास्क येथील गोदामात धुउन पुन्हा विक्रीसाठी आणण्याचा घाट गोदाम मालक-चालक करीत असल्याची खबर भिवंडी पोलिसांना मिळताच पंचायत समिती आरोग्य विभागाने तपासणी केली असता भिवंडी तालुक्‍यातील वळ गाव येथील पारसनाथ कंपाऊंड गोदामातील माल पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई मनपा पाणीपुरवठा पाईपलाईनशेजारील कचऱ्यात फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी नोंद घेत तपास सुरू केला आहे. भिवंडी तालुक्‍यातील काल्हेर, कशेळी, पूर्णा, कोपर, दापोडा, राहनाळ आणि वळ अशा विविध ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट मालाची साठवणूक करणारी गोदामे असून विविध राज्ये व परदेशांतून आलेला विविध प्रकारचा माल या गोदामात साठवला जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन शासन व डॉक्‍टरांच्या वतीने करण्यात आल्यामुळे भिवंडीतील मेडिकल दुकानात मोठ्या प्रमाणात मास्कविक्री सुरू झाली आहे. त्यामुळे मास्कचा तुटवडा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भिवंडी तालुक्‍यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून कपडे, भंगार इलेक्‍ट्रॉनिक मालासह परदेशात वापरलेले मास्कसुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत; मात्र ते दूषित असल्याची खबर ठाणे पोलिस आयुक्त डॉ. विवेक फणसाळकर व भिवंडी पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळताच त्यांनी आरोग्य विभाग ठाणे व भिवंडी यांना याबाबत माहिती दिली. 

भिवंडीतील वळ गाव पारसनाथ कंपाऊंडमधील इमारतीमधील एका गोदामात मास्क असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर ग्रामस्थांसह बि- 108 या गोदामात गेले असता तेथील कामगाराने मास्क पूर्णा ग्रामपंचायत हद्दीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनशेजारील कचरा टाकण्याच्या जागेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी ही माहिती आरोग्य विभागासह नारपोली पोलिसांना दिली. 

ही बातमी वाचा ः त्यांनी झाडल्या महिला पोलिसावरच गोळ्या

कारवाईकडे नागरिकांचे लक्ष 
भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, सहायक पोलिस निरीक्षक के. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर मालाचा पंचनामा करून नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. हा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना आरोग्य विभाग व पोलिसांनी पत्र दिले आहे. वापरलेल्या दूषित मास्कची साठवणूक करून विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिस काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Masks used abroad were found in Bhiwandi