त्यांनी झाडल्या महिला पोलिसावरच गोळ्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला विरार येथील प्रकार

नालासोपारा - जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला विरार येथे प्रभारी महिला पोलिसावर गोळीबार झाल्याची घटना घडली. पालघर स्थानिक गुन्हे शाखा वसई युनिटच्या प्रभारी सिद्धावा जायभाये यांच्या गाडीवर अज्ञात इसमांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सिध्दवा या थोडक्‍यात बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

हेही वाचा - 'मेट्रो रेल्वेचे श्रेय लाटू नये'

शनिवारी (ता.7) संध्याकाळी 8.30 च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत नोवेलटी हॉटेलच्या शेजारी ही घटना घडली. याबाबत अज्ञात आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. सिद्धवा या नालासोपारा कार्यालयातून शनिवारी रात्री 8 च्या सुमारास आपल्या सहकार्यांसह त्यांच्या खाजगी स्विफ्ट गाडीमधून पालघरला आपल्या घरी जात होत्या. यावेळी 8.30 च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत नोवेलटी हॉटेलच्या बाजूला त्या पार्सल घेण्यासाठी थांबल्या होत्या.

त्या गाडीतून उतरुन पार्सल घेण्यासाठी जाण्याच्या तयारीत असतानाच काळ्या रंगांच्या मोटारसायकलवर, तोंडाला मास्क बांधून आलेल्या दोन अज्ञात इसम त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यासाठी आले. त्यांच्या सोबतच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हे लक्षात येताच त्याने प्रसंगावधान दाखवत सिध्दवा यांना तात्काळ गाडीमध्ये ओढले. त्यामुळे हल्लेखोरांच्या दोन्ही गोळ्या गाडीच्या बोनेट वर बसल्या. त्यानंतर आरोपींनी तात्काळ तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. ज्या ठिकाणी गोळीबार झाला तेथे सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होत आहेत. 

हेही वाचा - भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामांना मिळणार गती

चार दिवसांपूर्वीच सिद्धवा आणि त्यांच्या साथीदारांनी टाटा अँड सनस या कंपनीच्या खात्यातील 200 करोड रुपयांचा हवाला मार्गे होणारा अपहार हाणून पाडला होता. यात 7 आरोपींना अटक देखील करण्यात आली होती. तसेच रेतीमाफिया, गुटखा माफिया यांच्यासह अवैध धंदे चालवण्यावर अनेक कारवाही देखील त्यांनी केल्या आहेत. दरम्यान अचानक त्यांच्यावर गोळीबार झाल्याने यामागे नेमका मुख्य सूत्रधार कोण? याचा तपास पोलीस करत आहेत. 

आम्ही या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक रवाना केले आहे. आम्ही संपूर्ण घटनेचा तपास करीत आहोत. लवकरच यातील आरोपींना आम्ही पकडून घटनेचा छडा लावू. - विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई 

web title : They shot bullets at women police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They shot bullets at women police