भिवंडीतील आश्रमशाळेत अवतरला मास्टर ब्लास्टर 

भिवंडी : आश्रमशाळेतील मुलांबरोबर सेल्फी घेताना सचिन. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
भिवंडी : आश्रमशाळेतील मुलांबरोबर सेल्फी घेताना सचिन. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

वज्रेश्‍वरी : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वांच्या लाडक्‍या सचिन तेंडुलकरने भिवंडी वज्रेश्‍वरीजवळील भिवाळी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळेत हजेरी लावत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी सचिनशी हात मिळवणे, सेल्फी काढणे, सही घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. शाळेत विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पाचे लोकार्पण सचिनच्या हस्ते करण्यात आले. 

भिवाळी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळेत सहाशेहून अधिक विद्यार्थी वास्तव्य करून शिकत आहेत. ग्रामीण भाग असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. त्यामुळे "स्प्रेडिंग हॅपिनेस इंडिया फाऊंडेशन'च्या वतीने आश्रमशाळेत "सोलर सिस्टीम' बसवून देण्यात आली आहे.

येथील संगणक लॅब, वसतिगृह या ठिकाणी सोलर सिस्टीम बसवण्यात आली, जेणेकरून मुलांना शिकत असताना वीज गेल्यामुळे काही त्रास होणार नाही आणि विशेष म्हणजे सूर्यास्त झाल्यावरही मुलांना खेळता यावे म्हणून येथील बास्केट बॉल ग्राऊंड येथेही सोलर बसवण्यात आले आहे. या सोलर प्रकल्पाचे लोकार्पण आज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा स्क्रीन प्रोजेक्‍टर शाळेला भेट देण्यात आला. 

तत्पूर्वी सचिनचे आगमन झाल्यावर पारंपरिक पद्धतीने ढोल लेझीमच्या तालात त्याचे स्वागत करण्यात आले. हा उपक्रम राबवणारे "स्किनेडर इलेक्‍ट्रिक'चे मॅनेजिंग डायरेक्‍टर अनिल चौधरी उपस्थित होते. त्यांनी यापुढे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. 

मैदानी खेळ खेळून फिट राहा

उपस्थित विद्यार्थ्यांशी सचिनने संवाद साधला. शिक्षण घेताना काही अडचणी येत असतील, काही चुका होत असतील तर तुमच्या शिक्षकांना विचारा आणि मन लावून अभ्यास करा. खूप मोठे होऊन भारताचे नाव मोठे करा. अभ्यासात तडजोड न करता अभ्यास झाल्यावर उरलेल्या वेळेत मैदानी खेळ खेळून फिट राहा आणि आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा सल्ला सचिनने विद्यार्थ्यांना दिला.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com