Mumbai News : अनुसुचित जातीचे वर्गीकरण करण्याची मातंग समाजाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

azad maidan mumbai

Mumbai News : अनुसुचित जातीचे वर्गीकरण करण्याची मातंग समाजाची मागणी

मुंबई : राज्यातील एका विशिष्ट जातीलाच अनुसुचित जातीचे फायदे वर्षानुवर्षे मिळत आहेत. त्यामुळे अनुसुचित जातीमध्ये वर्गीकरण झालेच पाहिजे. त्यासोबतच साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना झालीच पाहिजे या मागणीसाठी आज मातंग समाजाने आझाद मैदान येथे आंदोलन केले.

राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन केले. विविध जातींचे प्रतिनिधीत्व असलेल्या सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली या जवाब दो आंदोलन करण्यात आले. अनुसुचित जातीमध्ये १३ टक्के आरक्षणात महाराष्ट्रातील ५९ जाती आहेत. अनुसुचित जातींमध्ये ५९ जातींमध्ये फक्त एकाच जातीला आरक्षणाचे फायदे मिळतात.

परंतु इतर ५८ जातींमध्ये आरक्षणाचा सर्वांगिण अभ्यास होणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने हा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमण्याची गरज आहे. या अभ्यासाच्या निमित्ताने अनुसुचित जातींचे प्रगत, कमी प्रगत, मागास, वंचित अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वर्गीकरण करण्यात यावे.

तसेच सर्वात मागास वर्गाला या आरक्षणात प्राधान्य देण्यात येण्याची मागणी सकल मातंग समाजाकडून करण्यात आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हे वर्गीकरण व्हावे, अशीही मागणी यानिमित्ताने करण्यात आली.

बार्टीच्या तत्वावरच साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना झाली पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या आर्टी संस्थेच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांपैकी मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी तसेच खासदारांनी आणि आमदारांनीही हजेरी लावल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.