esakal | माथेरान पर्यटकांनी गजबजले; आठ महिन्यांत प्रथमच पर्यटकांची मांदियाळी 
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरान पर्यटकांनी गजबजले; आठ महिन्यांत प्रथमच पर्यटकांची मांदियाळी 

पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणजे माथेरान, हे पुन्हा एकदा पर्यटकांनी दाखवून दिले. लॉकडाऊननंतर प्रथमच आठ महिन्यांनी माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पाहावयास मिळाली

माथेरान पर्यटकांनी गजबजले; आठ महिन्यांत प्रथमच पर्यटकांची मांदियाळी 

sakal_logo
By
अजय कदम

माथेरान : पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणजे माथेरान, हे पुन्हा एकदा पर्यटकांनी दाखवून दिले. लॉकडाऊननंतर प्रथमच आठ महिन्यांनी माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पाहावयास मिळाली. पर्यटकांच्या आगमनाने माथेरानकर मात्र सुखावला आहे. 

हेही वाचा - ठाकरे सरकारचा वीजबिलबाबत झटका; ग्राहकांना सवलत नाहीच

दिवाळीचा पर्यटन हंगाम हा माथेरानचा प्रमुख हंगाम मानला जातो. कोव्हिड 19 काळात पर्यटक माथेरानला भेट देतील की नाही? अशी शंका माथेरानकरांना भेडसावत होती. मात्र, पर्यटकांनी माथेरानवरील प्रेम अबाधित ठेवत एकच गर्दी केली. हॉटेल, लॉजिंग, पॉईंट सर्व पर्यटकांनी बहरले आहे. त्यामुळे गेली आठ महिने शांत असणारे माथेरान आज पर्यटकांनी फुलून गेले आहे. 
लक्ष्मीपूजननंतर रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून पर्यटक आपल्या खासगी वाहनाने माथेरानकडे येऊ लागले. माथेरानचे एकमेव असलेले वन विभागाचे व वन व्यवस्थापन समितीचे वाहनतळ सकाळी 11.30 वाजताच वाहनांनी भरून गेले. पर्यटकांची वाहने येतच असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. या वेळी 400 चारचाकी वाहने आणि 550 पेक्षा अधिक वाहने उभी होती. तरीही पार्किंगसाठी रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. ही रांग 300 मिटरहून अधिक होती. मात्र, येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई गुलाब भोई यांनी कार्यतत्परता दाखवत वाहतूक सुरळीत करून पर्यटकांना मदतीचा हात दिला. त्यामुळे काही पर्यटकांचा वेळ वाचला. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी 6500 पेक्षा अधिक पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाल्याचे कर निरीक्षक तथा करप्रमुख राजेश रांजाणे यांनी सांगितले. 

हेही वाचा - 'सत्ताधाऱ्यांनाच सतावतीये सरकार पडण्याची भीती'; प्रवीण दरेकर यांचा टोला

मिनी ट्रेन भरगच्च 
अमन लॉज-माथेरानच्या शटल सेवेच्या फेऱ्या पर्यटकांनी भरून धावत होत्या. त्यामुळे 22 नोव्हेंबरपर्यंत शटल सेवेच्या रोज अप आणि डाऊन मार्गावर आठ फेऱ्या होणार आहेत, असा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

हॉटेल फुल 
आर्थिक कंबरडे मोडलेल्या हॉटेल इंडस्ट्रीला या दीपावली पर्यटन हंगामात थोडासा दिलासा मिळाला आहे. सलग सुटीमुळे हॉटेलच्या बुकिंग अगोदरच झाल्या होत्या. त्यामुळे पर्यटकांना वेळेवर आपल्या इच्छितस्थळी जाणे शक्‍य झाले. 

माथेरानमध्ये आठ महिन्यांनंतर समाधानकारक पर्यटक दिसत आहे. पर्यटकांनी माथेरानच्या निसर्गाचा आनंद घेताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कारण कोव्हिड अजून संपलेला नाही. 
- प्रेरणा प्रसाद सावंत,
नगराध्यक्षा 

माथेरानमध्ये आठ महिने पर्यटक नव्हते. आमची आर्थिक घडी विस्कटलेली होती; पण दिवाळी पर्यटन हंगामात शनिवार व रविवारी पर्यटक दाखल झाल्याने आम्हाला थोडासा दिलासा मिळाला आहे. 
- राजेश चौधरी,
अध्यक्ष, व्यापारी फेडरेशन 

Matheran is bustling with tourists For the first time in eight months

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )