esakal | सिडकोच्या 90 हजार घरांना महापौरांची नकारघंटा 
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोच्या 90 हजार घरांना महापौरांची नकारघंटा 

रेल्वे स्थानकातील वाहनतळ, बसडेपो व ट्रकटर्मिनलच्या वापराला विरोध 

सिडकोच्या 90 हजार घरांना महापौरांची नकारघंटा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सुमारे 90 हजार घरांच्या महागृहसंकुल प्रकल्पाला नवी मुंबईचे महापौर जयवंत सूतार यांनी नकारघंटा दर्शवली आहे. शहरातील रेल्वे स्थानकांमधील वाहनतळ, ट्रक टर्मिनल्स आणि कळंबोली येथील बस स्थानक परिसरातील मोकळ्या जागांचा वापर गृहसंकुलासाठी करण्यास नियोजनाच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे सुतार यांनी पत्रात म्हटले आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे शहरातील पाणी पुरवठा, मलनिःस्सारण व्यवस्था, रस्ते वाहतूक आदी पायाभूत सुविधांवर ताण पडणार असल्याने हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी सूतार यांनी केली आहे. 

सूतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देऊन गृहसंकुलाचा प्रकल्प केल्यास नवी मुंबई शहराचे नियोजन कसे बिघडेल याची भिती व्यक्त केली आहे. राज्य सरकारने नवी मुंबईच्या नियोजनासाठी सिडकोला 1979ला नियोजन प्राधिकरण म्हणून अधिकार प्रदान केले होते. तेव्हा शहराचे 344 चौरस किलो मीटर या क्षेत्राकरीता भविष्यात 20 लाख लोकसंख्या गृहीत धरून नियोजन करण्यात आले होते.

1991च्या अधिसूचनेनुसार 30 गावांचा समावेश करून नवी मुंबई महापालिकेची 1992 ला स्थापना झाली. तेव्हा 109. 59 चौरस किलो मीटर एवढे महापालिकेचे क्षेत्रफळ होते. राज्य सरकारने यानंतर 2008 ला सिडकोचे प्राधिकरण म्हणून अधिकार संपवून घणसोली नोडसहीत पालिकेला प्राधिकरण म्हणून अधिकार प्रदान केले. मात्र सिडकोने विविध नोड, सेक्‍टर, रेल्वे स्थानके, बसस्थानके, डेपो व ट्रक टर्मिनल्स स्वरूपाचे शहराचे नियोजन करताना रहीवाशी वापराला अतिरीक्त चटई क्षेत्र मंजूर केले. त्यामुळे मुळ नियोजनापेक्षा अपेक्षित लोकसंख्येपेक्षा महापालिका हद्दीतील लोकसंख्येने 15 लाखांचा आखडा केव्हाच पार केला आहे.

लोकसंख्येनुसार शहरात वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरात नियोजित वाहनतळांची संख्याही अपुरी भासू लागली आहे. सद्या नवी मुंबई शहरात राहणारा नागरीक कामाला जाताना रेल्वे स्थानकांबाहेरील वाहनतळांमध्ये वाहने उभी करून जात आहे. या जागा इमारतींनी व्यापल्यास शहरात वाहने उभी करण्याचा मोठा प्रश्‍न उभा राहणार आहे. अवजड वाहनांची भर पडू नये म्हणून नियोजित केलेल्या ट्रक टर्मिनल्सचा वापर इमारतींसाठी केल्यास अवजड वाहनांचा प्रश्‍न निर्माण होऊन पुन्हा शहराच्या वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे गृहप्रकल्प रद्द करावा अशी मागणी सूतार यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


कळंबोली बस स्थानक महापालिकेचे 

सिडकोतर्फे कळंबोली बस स्थानकाच्या जागेवर 90 हजार घरांपैकी काही घरांचा गृहसंकुल प्रकल्प राबवण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र ही जागा याआधीच सिडकोने करारानुसार कळंबोली सेक्‍टर 2 मधील भूखंड क्रमांक 10 महापालिकेला हस्तांतरीत केले आहे. याठिकाणी महापालिका एनएमएमटी द्वारे पनवेल, उरण आणि आदी शहरात वाहतूक सुविधा पुरवणार आहे. परंतू महापालिकेची संमती न घेता सिडकोने थेट हा भूखंड गृहप्रकल्पाच्या वापरासाठी नियोजित केल्याचे चूकीचे असल्याने महापौर जयवंत सूतार यांनी पत्रात नमूद केले आहे.  

राजकीय वर्तुळात आश्‍चर्य! 

भाजपच्या वाटेवर असलेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वादानेच नवी मुंबई महापालिकेचा कारभार चालवला जातो. काही दिवसांपूर्वीच त्यांचे पुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ आता नाईकदेखील प्रवेश करणार आहेत. मात्र, दस्तुरखुद्द फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या 90 हजार घरांच्या प्रकल्पाला नाईकांच्या मर्जीतील महापौरांनी विरोध केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

 
 

loading image
go to top