कोविशिल्ड कलयुगातील संजीवनी मुंबईत दाखल: महापौर किशोरी पेडणेकर

भाग्यश्री भुवड
Wednesday, 13 January 2021

कलयुगातील संजीवनी आज मुंबईत आली आहे. यामुळे कोरोना संपुष्टात येणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई: लसीकरणात कोणतीही कमी राहू नये म्हणून मुंबईत 15 तारखेला आणखी एक ट्रायल घेतली जाणार आहे. 8 तारखेला ड्राय रन न झालेल्या 9 पैकी 6 सेंटर 
मध्ये ही लसीकरणाची ट्रायल केली जाईल अशी माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. पालिकेच्या केईएम, सायन, नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कोरोना जंबो सेंटर आदी 6 ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. 

दरम्यान, 13 तारखेला सकाळी 5.30 च्या सुमारास मुंबईतही कोरोनाची लस दाखल झाली असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केलं आहे. कलयुगातील संजीवनी आज मुंबईत आली आहे. सिरमची लस कोव्हिशिल्ड मुंबईत आणली गेली. यामुळे कोरोनाचा खात्मा होणार आहे. एकूण 1,39 , 500 लसीचे डोस मुंबईत आणले गेले आहेत. ज्याचा फायदा मुंबईकरांना निश्चित होईल असाही विश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत एकूण 1 लाख 30 हजार आरोग्य सेवकांची नोंदणी झाली आहे. मुंबईत 9 ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने आधीपासूनच तयारी केली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. लसीकरणासाठी 9 ठिकाणे लसीकरण केंद्र सज्ज आहेत. परळ येथील कोल्ड स्टोर मधून ही लस सर्व ठिकाणी पाठवली जाईल. शिवाय, या लसीकरणासाठी पालिकेची यंत्रणा पहिल्यापासून सज्ज होती.

हेही वाचा- ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

कलयुगातील संजीवनी मुंबईत

मुंबई महापालिका कोरोना आल्यापासून काम करत आहे. त्यामुळे, आजचा दिवस महत्वपूर्ण असून मुंबईकरांना मोठी संजीवनी मिळणार आहे. काही लोक गैरसमज पसरवत आहेत , हे योग्य नाही. जे कोणी बोलत आहेत त्यांनी अस बोलून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, नागरिकांनी घाबरू नका असे आवाहन ही महापौरांनी केले आहे.

लसीकरण मोहिमेचे पाच टप्पे तयार

आज सकाळी लस मुंबईत दाखल झाली आहे. तापमान 2 ड्रीगी ते 8 ड्रीगी ठेवलं आहे. 16 जानेवारीला सकाळी ही लस सर्व केंद्रावर पोचवली जाईल. सर्व केंद्रावर ही लस ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीला केंद्रांने परवानगी दिली आहे. 1 लाख 25 हजार आरोग्य सेवक यांना लस दिली जाईल. लस घेतली तरी कोरोना चे नियम जे आहेत ते पाळावेच लागतील. लसीकरण मध्ये आयटीचा वापर करत आहोत , पहिल्या दिवशी किती लोकांना बोलवायचं आहे , याच नियोजन केले आहे. प्रत्येक आरोग्य सेवकांना मोबाईलवर एक संदेश पाठवला जाईल त्यात त्यांना ठिकाण आणि वेळ कळवली जाईल. लस केंद्रावर येताना आपले आयडी प्रूफ आणायचे आहेत. लसीकरण करताना सर्व तयारी आम्ही केली आहे. पहिला डोस एका लसीचा घेतल्यावर दुसरा सुद्धा त्याच लसीचा डोस दिला. टप्याटप्याने लस मुंबईत दाखल होईल, असे ही काकाणी यांनी सांगितले. लसीबाबत गैरसमज पसरवू नये. तसेच नागरिकांनीही अशा अफवांना बळी पडून घाबरून जावू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

50 लाख लस स्टोअर करण्याची क्षमता

मुंबईत निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये 10 लाख लस स्टोअर करण्याची क्षमता आहे. या ठिकाणी -25 ते -15 डिग्री तापमानची सुविधा करण्यात आली आहे. तसेच लसीचे स्टोरेज करण्यासाठी कांजूरमार्ग येथे मुबलक जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 50 लाखांहून अधिक लस स्टोअर करता येऊ शकतील, शिवाय, ज्या वेळेस 10 लाखांपेक्षा जास्त लसीचे डोस उपलब्ध होतील ते तात्काळ कांजूरमार्ग येथे ठेवता येतील अशी तयारी ही तिथे आहे असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनाची लस आल्यानंतर 24 तासात आपल्याला पहिल्या टप्प्यातील लोकांना लस देता येईल. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 8 सेंटर तयार आहेत. उद्यापर्यंत आणखी 8 सेंटर तयार होतील. तसेच घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय हे दोन सेंटरमध्ये काम करेल. त्यामुळे अशाप्रकारे आपले 16 सेंटर तयार होतील. दरम्यान मुंबईत जवळपास 50 सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रत्येक सेंटर 2 शिफ़्टमध्ये काम करणार आहे.

सर्वप्रथम लस कोणाला मिळणार?

सरकारी कर्मचारी : परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mayor Kishori Pednekar mumbai Vaccination Covishield bmc


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor Kishori Pednekar mumbai Vaccination Covishield bmc