Measles Outbreak Mumbai: आजाराची लक्षणे काय? आपल्या बाळाची काळजी कशी घ्याल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Measles Outbreak Mumbai: आजाराची लक्षणे काय? आपल्या बाळाची काळजी कशी घ्याल?

Measles Outbreak Mumbai

गोवंडीत तीन मुलांचा गोवरने मृत्यू झाल्यानंतर आता मुंबईत गोवरची साथ आल्याचे आता महानगरपालिकेने मान्य केले आहे. गोवरचा संसर्ग झाल्यानंतर झालेल्या काही गुंतागुंतीमुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवरच्या साथीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक उच्चस्तरीय पथक मुंबईत नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय.

मुंबईत नेमकं काय घडलं, गोवरची लक्षण काय आणि बाळाला हा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या...

मुंबईत गोवरची साथ पसरल्याचे उघड कसे झाले?

मुंबईतील गोवंडी येथील रफीनगर झोपडपट्टीत काही दिवसांपूर्वी ४८ तासांमध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचा मृत्यू गोवरने झाल्याचे निष्पन्न होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.

हसनैन खान (५), नुरीन खान (३) आणि फजल खान (१४ महिने) अशी या मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. त्यांना ताप आला होता तसेच शरीरावर पुरळही उठले होते. या कुटुंबातील मुलं कमी वजन आणि इतर आजारांनी त्रस्त असल्याची माहिती कुटुंबीयांकडून मिळाली. धारावी शिवाय मुंबईत जवळपास १२ ते १५ भागात गोवरचा प्रादुर्भाव असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेने काय उपाययोजना राबवल्या?

गोवर आजाराचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने आता या भागात गोवरप्रतिबंधक मोहीम सुरू केली आहे. मंगळवारपर्यंत मुंबई महापालिकेने मुंबईत गोवरच्या २९ रुग्णांची नोंद केली होती. यातील बऱ्याचशा मुलांना पुरळ, ताप आणि डोळ्यांतून पाणी वाहणे आदी लक्षणे दिसून आली. यातील जवळपास ५० टक्के मुलांनी गोवरची लस घेतलेली होती मात्र मृत्यू पावलेल्या तिघांनी मात्र ही लस घेतली नसल्याचे समजते.

लसीकरणासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून आशा आणि आरोग्यसेविका घरोघरी जाऊन मुलांचे लसीकरण करत आहेत.

गोवंडी, धारावीत सर्वाधिक रुग्ण का?

महापालिकेचे सहायक आयुक्त महेंद्र उबाळे सांगतात, एम पूर्व विभागात (गोवंडी, धारावीचा या भागात समावेश होतो) समाजांतील विविध स्तरांतील लोक राहतात. शिवाय शिक्षणाचे प्रमाण फार नगण्य आहे. त्यामुळे अनेक अपत्य जन्माला घातली जातात. त्यांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जाते.

लसीकरणाला पर्याय नाही! (Measles prevention)

-गोवरची लस आपल्या बाळाला देणे, सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पालकांनी आपल्या बाळाचे गोवर लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

-जागतिक आरोग्य संघटना अर्थात (WHO)च्या शिफारशीनुसार सगळ्या मुलांनी गोवर आणि जर्मन गोवर या लशीचे दोन डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. गोवर, जर्मन गोवर (measles-rubella -MR)किंवा गोवर-गालगुंड-जर्मन गोवर (measles-mumps-rubella -MMR)अशाप्रकारे कॉम्बिनेशन असलेल्या लसी घेण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

- ९-१२ महिन्यांच्या वयात बाळाला लसीचा पहिला डोस दिला जातो तर दुसरा डोस १६-२४महिन्यांच्या वयात दिला जातो.

गोवरची लक्षणे (Measles Syptoms in Marathi)

> गोवर हा संसर्गजन्य आजार आहे.

> आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरतो.

> खोकल्यातून आणि शिंकण्यातून या आजाराचा प्रसार होतो.

> संसर्ग झाल्यानंतर १०-१२ दिवसांनंतर लक्षणे जाणवू लागतात. त्यामध्ये पुरळ, ताप, डोळे लाल होणे तसेच डोळ्यातून पाणी वाहणे आणि वाहते नाक ही या आजाराची लक्षणे आहेत.

> पाच वर्षांखालील मुलांमध्ये हा आजार आढळून येतो.

केंद्राचे पथक मुंबईत

गोवरच्या या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची नेमणुक करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी उपाययोजना तसेच मार्गदर्शक नियमावली तयार करण्यासाठी राज्य आरोग्य यंत्रणेला ही तज्ज्ञांची समिती मदत करणार आहेत. डॉ अनुभव श्रीवास्तव, उपसंचालक (IDSP)आणि NCDC चे उपसंचालक श्री अनुभव श्रीवास्तव या समितीचं नेतृत्तव करत आहेत. या समितीमध्ये नवी दिल्लीचे लेडी हार्डिंग्ज वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागीय कार्यालय, पुणे येथील तज्ज्ञांचाही समावेश आहे.