esakal | मुंबई महापालिकेची संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी उपाययोजना
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

मुंबई महापालिकेची संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी उपाययोजना

sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: तिसऱ्या लाटेच्या पूर्वी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. त्यानुसार महिलांच्या यशस्वी लसीकरण मोहिमेनंतर मुंबई महापालिका आता विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवणार आहे. येत्या आठवडाभरात राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत १८ वर्षावरील बहुतांश विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

हेही वाचा: लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या आरोपीला एटीएस घेतले ताब्यात

मुंबईत बाराशेहून अधिक महाविद्यालये आहेत. त्यात ७ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील साधारणता तीन लाख विद्यार्थी १८ वर्षांवरील आहेत. त्यापैकी निम्म्या विद्यार्थ्यांनी लस घेतली असण्याची शक्यता आहे; मात्र लसीकरणाचा टक्का तुलनेने कमी आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबवून हा टक्का वाढवण्याचा पालिका प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी परदेशी जाणाऱ्या २८ हजार ९०३ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.

मुंबईतील महाविद्यालये सध्या ऑनलाईन सुरू असली तरी अनेक विद्यार्थ्यांना काही कारणास्तव घराबाहेरही फिरावे लागते. शिवाय ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान आणि किशोरवयीन मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तिसरी लाट रोखण्यात यश आल्यास महाविद्यालये सुरू करणे शक्य आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर जोर देण्यात येत आहे.

पुढील आठवडाभरात एका दिवशी विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना घराजवळील केंद्रांवर जाऊन लस घेता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन ओळखपत्र दाखवावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र नसेल त्यांना विद्यार्थी असल्याचे अन्य ओळखपत्र दाखवून लस घेता येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. या विशेष मोहिमेसाठी पालिकेकडून जय्यत तयारी सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

विशेष जनजागृती

मुंबईत ५१७ लसीकरण केंद्र आहेत. त्यात महापालिकेचे ३०२ केंद्र असून या सर्व केंद्रांवर फक्त विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. जेवढा लशींचा साठा उपलब्ध आहे, तेवढे डोस देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. कोविशिल्ड आणि को-व्हॅक्सिन लशींची मात्रा उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांपर्यंत या मोहिमेची माहिती पोहोचावी यासाठी विशेष जनजागृती ही करण्यात येणार आहे.

दृष्टिक्षेप

  • मुंबईत एकूण महाविद्यालये ७५०

  • विद्यार्थी संख्या ७ लाखाहून अधिक

  • १८ वर्षावरील विद्यार्थी ३ लाखाहून अधिक

  • मुंबईत दोन्ही डोस मुबलक उपलब्ध

  • घराजवळील केंद्रांवर लस सुविधा

  • ओळखपत्र दाखवून लस घेता येणार

मुंबईत महिला विशेष लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याचा विचार आहे. मुंबईतील लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई पालिका.

loading image
go to top