कल्याणमधल्या पत्रिपुलासाठी मेगाब्लॉक जाहीर, नागरिकांचे होणार हाल 

रविंद्र खरात
Wednesday, 18 November 2020

नवीन पत्रिपुल गर्डर लॉचिंग करण्यासाठी मध्य रेल्वेने येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजेच 21 आणि 22 नोव्हेंबरला प्रत्येकी 4 तास असे 8 तास मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या काळात पत्रिपुलावरील वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईः नवीन पत्रिपुल गर्डर लॉचिंग करण्यासाठी मध्य रेल्वेने येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजेच 21 आणि 22 नोव्हेंबरला प्रत्येकी 4 तास असे 8 तास मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या काळात पत्रिपुलावरील वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी रस्त्यावर रस्त्याचे आणि पुलाचे काम अर्धवट असून तेथे काम सुरू असल्याने वाहन चालक आणि नागरिकांचे हाल होणार आहे.

असा असेल मेगाब्लॉक

21 नोव्हेंबर- सकाळी 10.15 ते दुपारी 2.15
22 नोव्हेंबर- सकाळी 9.45 ते दुपारी 1.15

नवीन पत्रिपुल गर्डर लॉचिंगसाठी मध्य रेल्वे प्रशासनानं 8 तासाचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

27 आणि 28 नोव्हेंबरला पहाटे 2 ते 5 पर्यंत
28 आणि 29 नोव्हेंबर पहाटे 2 ते 5 पर्यंत  असा सहा तासांचा मेगाब्लॉक असेल. 

त्यामुळे एकूण 14 तासांचा विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मेगाब्लॉकमुळे नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने केडीएमटी, टीएमटी, एसटी प्रशासनाला विशेष बसेस सोडण्याबाबत सूचना दिल्या असून त्याची तयारी सुरू आहे. वाहतूक विभागाला वाहतूकीतील बदलांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वाहतूक विभागाला रस्ता खोदण्याच्या सुचनाच नाही

मेगाब्लॉक काळात पत्रिपुलावरील वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी पर्यायी वाहतूक बदल काय करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण की कल्याण पूर्व वरून कल्याण पश्चिमेला जोडणारा स्वर्गीय आनंद दिघे उड्डाण पुलावर डांबरी करणं आणि पट्ट्या बदलण्यासाठी खोदकाम केले आहे.

पुलाच्या खालील वालधुनी दिशेच्या सिमेंट रस्त्यांचे काम अंतिम टप्यात आहे. रस्ता खोदणे अथवा पुलाचे काम, रस्त्याचे काम करताना वाहतूक विभागाला कळविणे अपेक्षित होते. मात्र सिमेंट रस्त्याचे काम कळविले मात्र पुलावरील दुरुस्तीचे काम न कळविल्याने मेगाब्लॉकच्या दिवशी नागरिकांचे चांगलेच हाल होणार आहे.

अधिक वाचा-  यंदाची ग्रीन दिवाळी, मुंबईत ध्वनी प्रदूषणाचा सर्वात निच्चांक

मेगाब्लॉकच्या दिवशी स्थानिक वाहतूक पोलिसांनी एफ केबिनजवळील स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपुलावरून वाहतूक वळवा असे अहवाल दिला मात्र प्रत्यक्ष पुलाचे काम सुरू असल्याने आता नागरिकांना कल्याण पश्चिममधून कल्याण पूर्वेला जाताना उल्हासनगरमधील शांतीनगरला वळसा घालावा लागणार आहे. अगोदरच पत्रिपुलावरील रात्रीची वाहतूक बंद आणि मेगाब्लॉकच्या दिवशी पर्याय रस्ता नसल्याने नागरिकांचे मेगाहाल होणारेत.
 
एफ केबिनजवळील सिमेंट रस्ता बनविण्याबाबत वाहतूक विभागाकडून पालिकेने परवानगी घेतली. मात्र पुलावरील खोदकाम बाबत मंजुरी नाही. अनेक वेळा पालिका अधिकारी वर्गाला सूचना देऊन ही त्याची अंमलबजावणी करत नाही. रस्ते, पूल दुरुस्ती कामे करण्याबाबत पूर्व सूचना द्या मात्र पालिका अधिकारी कळवत नसल्याची माहिती कल्याण वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली.

पूल आणि रस्त्याच्या कामाला अगोदरच 31 जानेवारी 2021 डेडलाईन असून त्या अगोदर म्हणजे नोव्हेंबर एन्डला पूर्ण करत आहोत. मेगाब्लॉकच्या दिवशी तेथून वाहतूक सुरू करणे शक्य नसल्याची माहिती पालिका कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी दिली.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Megablock announced for Patripul in Kalyan citizens will be affected


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megablock announced for Patripul in Kalyan citizens will be affected