डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : मानसिक छळ अधिक भयावह, न्यायालयाचे मत;

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी हे मत व्यक्त केले.

मुंबई : नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. हा अपघाताचा किंवा खुनाचा खटला नाही, मानसिक छळाच्या जखमा भरून येत नाहीत. त्यामुळे मानसिक छळ अधिक भयावह असतो, असे मत उच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. तसेच या खटल्यातील साक्षीदारांचे जबाब तातडीने नोंदवण्याचा आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. 

डॉ. पायल यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी न्या. साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. आरोपपत्रातील सहा महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब अद्याप नोंदवले नसल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. डॉ. पायल यांनी आरोपींकडून रॅगिंग होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ डॉक्‍टरांकडे अनेकदा केल्या होत्या; मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी वरिष्ठ डॉक्‍टरांवरही कारवाई करावी, असे सरकारी वकील राजा ठाकरे म्हणाले.

या सुनावणीचे वार्तांकन करण्यास प्रसारमाध्यमांना मनाई करावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. आरोपींच्या वतीने वकील आबाद पोंडा यांनीही या मागणीचे समर्थन केले; मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. यापूर्वीही अशी मागणी अमान्य केल्यामुळे आता आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सेवाभाव उरला आहे का?  
डॉक्‍टरांच्या कामात आता सेवाभाव राहिला  आहे का? जर डॉक्‍टर स्‍वत:च्‍या सहकाऱ्यांबरोबर मानवीय दृष्‍टीकोनातून वागत नसतील तर रुग्‍णाबरोबर कसे वागत असतील?. आरोपींना जामीन मिळाला असला तरी देखील खटला संपेपर्यंत अशा डाॅक्टरांचे परवाने रद्द व्हायला हवे असे मत न्यायालयाने दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mental torture is more frightening says mumbai high court