मेट्रो- ३ सुरु होण्यास आता किमान तीन वर्षे उजाडण्याची शक्यता

मृणालिनी नानिवडेकर
Tuesday, 13 October 2020

मेट्रो ३ सुरु होण्यास आता २०२३ उजाडणार अशी भीती व्यक्त केली जाते आहे. संपूर्णत: भूमीगत असलेली मेट्रो २७ स्थानकांवरून प्रवास करीत तब्बल १३ ठिकाणी मध्य आणि पश्चिम रेल्वेला एकत्र मिळत होती.

मुंबई: आरेची हिरवाई कायम राखण्याच्या भावनेचा आदर नागरिक करत असले तरी मुंबईतील वेगवेगळे रेल्वेमार्ग जोडणारी  मेट्रो ३ सुरु होण्यास आता २०२३ उजाडणार अशी भीती व्यक्त केली जाते आहे. संपूर्णत: भूमीगत असलेली मेट्रो २७ स्थानकांवरून प्रवास करीत तब्बल १३ ठिकाणी मध्य आणि पश्चिम रेल्वेला एकत्र मिळत होती. दोन्ही मार्गांवर नसलेले भाग तिसऱ्या मेट्रोमार्गामुळे जोडले जात असल्याने ही सर्वाधिक महत्वाची मेट्रो आहे. आरे कारशेडऐवजी कांजूर भागात असलेल्या सरकारी मालकीच्या जागेवर डेपो होणार ही चांगलीच बाब मानली तरी नव्या डेपोसाठी सहा किलोमीटर लांब जावे लागेल. या मार्गाची आखणी आता सुरु होईल.

या नव्या मार्गासाठी रस्त्यातील काही खासगी मालमत्ता विकत घ्याव्या लागणार का हा विषय तपासून पहावा लागेल. आज एमएमआरडीएचे आयुक्त ए.राजीव यांनी कांजूरची जागा सरकारच्या ताब्यात आहे.  मात्र अन्य कारणांमुळे मेट्रोची उभारणी २०२३ पर्यंत होईल असे सांगितले. माध्यमांशी बोलताना त्यांनी मेट्रो तीन आणि मेट्रो सहा आता एकाच ठिकाणी एकत्र येतील असे सांगत या जमिनीमुळे हे एकीकरण शक्य होणार असल्याचे नमूद केले.

अधिक वाचा-  लॉकडाऊनमध्ये महिलांची दुहेरी कसरत, पाठीच्या दुखण्यांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

मेट्रो तीन दक्षिण मुंबईतील चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या दोन महत्वाच्या स्थानकांना जोडते. हे एकीकरण प्रवाशांना दिलासादायक आहे याकडेही लक्ष वेधले जात होते. मेट्रोवुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांनी या भुयारी तिसऱ्या मार्गाला सर्वाधिक महत्व दिले होते.

अधिक वाचाः  खंडित विजेचा विद्यार्थ्यांना धक्का; 10 समूह महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

आज पर्यावरणवादी कार्यकर्ते,मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांनी सरकारने आरे वाचवले याबद्दल आनंद व्यक्त केला तर भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत केव्हा दाखल होईल असा प्रश्न केला. किरीट सोमैया आणि अतुल भातकळकर यांनी मेट्रोचे काम ठप्प पडल्याने दररोज  ५ कोटींचे नुकसान होत असून करदात्यांवर हा अन्याय आहे असे नमूद केले आहे.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Metro 3 is now expected to start in 2023


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro 3 is now expected to start in 2023