‘म्हाडा’च्या शिबिरात बांगलादेशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

‘म्हाडा’कडे या संक्रमण शिबिराबाबत तक्रारी आल्या आहेत. स्थानिक पोलिसांत तक्रार दिली असून, बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. हे प्रकरण गंभीर असून ‘म्हाडा’तर्फे तातडीने पावले उचलण्यात येतील.  
- सतीश लोखंडे, मुख्य अधिकारी, म्हाडा

मुंबई - ‘म्हाडा’च्या मुलुंड गवाणपाडा येथील संक्रमण शिबिरांचा ताबा बांगलादेशी घुसखोरांनी घेतला आहे. या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही दलालांनी तेथील खोल्या बांगलादेशी घुसखोरांना भाड्याने दिल्या आहेत. याप्रकरणी ‘म्हाडा’ने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यात हे घुसखोर बांगलादेशी असल्याचे म्हटले आहे.

गवाणपाडा परिसरात ‘पीएमजीपी’अंतर्गत म्हाडाचे संक्रमण शिबिर आहे. गेल्या वर्षी झालेल्या सर्वेक्षणात येथील १७९ खोल्या रिकाम्या असल्याचे समोर आले होते. प्रत्यक्षात मात्र या खोल्यांमध्ये काही नागरिक बेकायदा राहत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या संक्रमण शिबिराला अद्याप भोगवटा प्रमाणपत्रही मिळालेले नाही.

बेकायदा राहणाऱ्या या नागरिकांना दलालांनी बेकायदा वीज व पाणीही उपलब्ध करून दिले आहे. इमारतीतील बहुतांश नागरिक बांगलादेशी असून भाड्याच्या रकमेतील टक्केवारी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

गवाणपाडा परिसरात ११ इमारतींत ४१६ सदनिका ‘म्हाडा’ने बांधल्या आहेत. त्या १८५ ते २२५ चौरस फुटांच्या आहेत. ‘म्हाडा’तर्फे २३७ कुटुंबे अधिकृतरीत्या राहतात; तर १७९ खोल्या रिकाम्या आहेत; मात्र यातील एकाही खोलीची किल्ली म्हाडाकडे नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mhada Bangaladesh People Police