
मुंबईतून परराज्यात गेलेले अनेक स्थलांतरित कामगार कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने या रुग्णांची धास्ती स्थानिकांनी घेतली आहे.
मुंबई: मुंबईतून परराज्यात गेलेले अनेक स्थलांतरित कामगार कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने या रुग्णांची धास्ती स्थानिकांनी घेतली आहे. उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यात शुक्रवारी 40 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. या 40 पैकी 33 रुग्ण हे मुंबई आणि परिसरातील कांदिवली, मुंब्रा,कळवा, भिवंडी, घाटकोपर, विक्रोळी,नालासोपारा,मालाड,अंधेरी आणि इतर परिसरातून स्थलांतरित झाले असल्याचे समोर आले आहे.
जौनपुरमध्ये या स्थलांतरित रुग्णांची चाचणी केल्यानंतर हे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. या 33 रुग्णांपैकी 28 रुग्णांना कोणत्याही प्रकरची लक्षणे नव्हती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या रुग्णांची चाचणी करण्यात आली होती.
उत्तर प्रदेश मध्ये शुक्रवारी 220 नवीन रुग्ण आढळले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 50 टक्के रुग्ण हे मुंबईतून आले होते. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 152 जण दगावले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5,735 इतकी झाली आहे.
जौनपुरचे अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारीआर के सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जौनपुर मधील एकूण 248 रुग्णांंपैकी 221 रुग्ण हे मुंंबईतून आले असून 2 रुग्ण हे मुुंबईतून स्थलांतरित झालेल्या रुग्णांचे नातेवाईक आहेत.
मुंबईतून आलेल्या कामगार तसेच कुटुंबाचा सर्वेक्षण तसेच आरोग्य तपासणी करणारे एक पथक तैनात ठेवले असल्याचेही सिंग यांनी सांगितले. मुंबई व्यतिरिक्त 12 रुग्ण दिल्ली, 4 अहमदाबाद आणि 3 रुग्ण सुरतशी संबंधित असल्याची माहिती ही त्यांनी दिली. जौनपुरमधील 248 रुग्णांंपैकी 110 रुग्ण बरे झाले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे ही ते म्हणाले. सध्या जौनपुरमध्ये 135 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
वाराणसी मध्ये शुक्रवारी 11 नवे रुग्ण सापडले असून त्यात मुंबईतील 28 वर्षीय टॅक्सी चालकाचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात तो मुंबईहून वाराणसी येथे आपल्या गावी गेला होता. तसेच गाझिपुर,आझमगड,भदोही या जिल्ह्यांत ही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. या जिल्ह्यांत ही अनेक लोक मुंबई, दिल्ली, अहमदाबाद,सुरत मधून स्थलांतरित झाली आहेत. देशभरातील विविध राज्यातून उत्तर प्रदेश मध्ये येणाऱ्या कामगारांना सक्तीने होम क्वारंटाईन होण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
migrants who went from mumbai to up tested corona positive