हाताला काम नसल्याने आदिवासी शहराकडे

नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

दिवसाकाठी केवळ २०६ रुपयांची मजुरी 

खर्डी : राज्यातील आदिवासी व भटक्‍या समाजातील लोकांना त्यांना राहत असलेल्या गावात मजुरी व शिक्षण मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे; परंतु या रोजगार हमी योजनेत शहापूर तालुक्‍यात काम करणाऱ्या मजुराला अतिशय कमी मजुरी मिळत असल्याने तालुक्‍यातील मजूर स्थलांतर करून बाहेरगावी कामाला जात आहेत. त्यामुळे या योजनेला घरघर लागली आहे. 

मजूर उपलब्ध होत नसल्याने अनेक ग्रामपंचायतीत कामे ठप्प झाली असून, काही कामे ठेकेदारामार्फत केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या योजनेला नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून रोहयोतील मजुरांची मजुरी वाढवून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शहापूर तालुक्‍यात रोजगार हमी योजनेंतर्गत ९ हजार मजुरांची नोंद सरकार दप्तरी आहे. मात्र यातील केवळ ४७१ मजुरांना रोजगार देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. तहसील कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार तालुक्‍यात केवळ ११८ कामे सुरू असून, कामे वाढवून मजुरांना अधिकाधिक कामे देण्याची मागणी होत आहे.

ग्रामपंचायतीच्या रस्त्याची कामे, घरकुलांची कामे, कृषी विभागाच्या फळबागेची कामे, वन विभागामार्फत रोप वाटिका तयार करणे, नैसर्गिक रोपांचे संगोपन करणे व तलाव साफ करणे यांसारखी मेहनतीची कामे रोहयोमार्फत कमी मजुरी देऊन केली जातात. यासाठी तालुक्‍यात ९ हजारांच्यावर मजुरांची नोंद करण्यात आली असून, त्यांना ग्रामपंचायतमार्फत जॉब कार्ड (ओळखपत्र) देण्यात आले आहे. असे असले तरी रोजगार नसल्याने यातील केवळ ४७१ स्थानिक मजूर २०६ रुपये हजेरीने सध्या काम 
करीत आहेत. मजुरांसाठी रोजगार उपलब्ध होण्यास अडचण येत असल्याने मजूर स्थलांतर करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migrations of Adiwasis to the City