
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे - मुंबई मार्गिकेवर सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास दुधाचा टॅंकर उलटला
नवीन पनवेल : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे - मुंबई मार्गिकेवर सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास दुधाचा टॅंकर उलटला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही; मात्र महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
हेही वाचा - मुंबईत अंमली पदार्थ विक्रीचा सुळसूळाट; कोट्यावधींची तस्करी होत असल्याची माहिती
द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ उतारावर टॅंकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून टॅंकरने पुढे चाललेल्या ट्रकला ठोकर दिली. अपघातात कोणासही दुखापत झाली नाही; मात्र टॅंकरमधील दूध रस्त्यावर सांडले. त्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने आणि दोन्ही वाहने दोन मार्गिकांवर उलटल्याने रस्ता बंद करावा लागला. त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे काही काळासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली होती.
हेही वाचा - पाणी पुरीसाठी अस्वच्छ पाण्याचा वापर करणाऱ्या वेलकम स्वीटस अँड स्नॅक्सवर कारवाई
बोरघाट वाहतूक चौकीचे पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी, उपनिरीक्षक महेश चव्हाण त्यांच्या पथकाने तत्कळ घटनास्थळी दाखल होऊन आयआरबीच्या हायड्रा व क्रेनने दोन्ही वाहन बाजूला काढून रस्त्यावर सांडलेले दूध बाजूला केले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
Milk tanker overturns on Mumbai-Pune expressway Vehicle congestion on the highway
-----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )