लाखो खासगी नोकरदारांचे प्रचंड 'प्रवासहाल'; रेल्वेत प्रवेश देण्याची मागणी

लाखो खासगी नोकरदारांचे प्रचंड 'प्रवासहाल'; रेल्वेत प्रवेश देण्याची मागणी


मुंबादेवी : मुंबई अनलाॅकच्या चौथ्या टप्प्यात असली तरी मुंबईची जीवनवाहिनी लोकलमध्ये केवळ सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश आहे. लाखो खासगी नोकरदारांसमोर बेस्ट बस व खाजगी वाहनांचाच पर्याय आहे. यातही कर्मचाऱ्यांच्या तुलनेत बसची संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रवासहाल सोसतच नोकरी करावी लागत असल्याचे चित्र संपुर्ण मुंबईत दिसून येत आहे. 

चर्चगेट,सीएसएमटी, ऑपेरा हाऊस, ग्रांटरोड, कुलाबा,मलबार हिल, मुंबादेवी, मशिद बंदर, सैंड्हर्स्ट रोड, गिरगाव, पंडित पलुस्कर चौक येथे सायंकाळी घरी जाण्यासाठी चाकरमाण्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. काही ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन होते तर, काही ठिकाणी तुंबळ गर्दी होते. कर्मचारी कित्येक तास केवळ बसची वाट पाहत असतात. अशाच रांगा ऑपेरा हाऊस, रॉक्सी सिनेमा येथील पंडित पलुस्कर चौक येथे लागलेल्या पाहुन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्यांसाठीही मुंबई लोकल रेल्वे सेवा तात्काळ सुरु करा, अशा घोषणा येथे दिल्या. तसेच, या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला. 

एका बसमध्ये केवळ 20 ते 25 प्रवाशांना मुभा आहे. मात्र, रोज एकेका बससाठी शे-दिडशे प्रवासी उभे असतात. सकाळी कामावर जाण्यासाठी आणि  संध्याकाळी कामावरून घरी परतण्यासाठी एक-दोन बस बदलाव्या लागतात. त्यात दोन-दोन तास बसची वाट पाहतच जात असल्याचा संताप चाकरमानी व्यक्त करत आहेत. यात काही प्रवाशांचा संयम संपतो व ते बस चालकाशी हुज्जत घालतात आणि बस मध्ये शिरतात. त्यांना रोखणेही शक्य होत नाही. कधी कधी तर बस पुर्ण भरते व सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडतो, असे चाकरमानी सांगतात. 

आमच्या बातम्या का दाखवत नाही?
अनलाॅकच्या पहिल्या टप्प्यानंतर मुलुंड, ठाणे, विरार, वसई, नालासोपारा, वाशी, बेलापूर, पनवेल तर काही अमरनाथ, बदलापुर, टिटवाला, शहाड येथून दक्षिण मुंबईतील विविध कार्यालयात लोक नोकरी साठी येत आहेत. यासाठी केवळ बेस्ट बस किंवा एसटी आहे. मात्र, हा प्रवास मोठा तापदायक आहे. द्रविडी प्राणायाम करूनच तो करावा लागतो, असे चाकरमानी सांगतात. माध्यमेही आमचे प्रश्न सोडून दिवसभर टीव्हीवर सुशांतसिंह राजपूत आणि रिया चक्रवती यांच्याच बातम्या दाखवतात. आमचे हाल त्यांना दिसत नाही का? असाही सवालही काही संतप्त चाकरमान्यांनी केला. 

आमचे दुःखणे फार वेगळे आहे. कामाला ये-जा करण्यातच 3-4 तास जातात. खासगी नोकरी असल्याने 15 मिनिटे उशीरा झाला तरी 
अर्ध्या दिवसाचा पगार कापला जातो. वर मालकाचे बोलणेही खावे लागतात. ते अडचणी समजून घेत नाही. काहीही करून लवकर याच, असे त्यांचे म्हण्णे असते. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे नोकऱ्या नाहीत. मला 16 हजार पगार आहे, मात्र इलाज नाही. कुटुंब जगवायचे तर, हे करावेच लागेल. सर्वत्र खासगी नोकरदारांची हिच स्थिती आहे. 
- राजाराम कांबळे

वरली ते गिरगावपर्यंतच्या प्रवासासाठी बेस्ट बस पकडावी लागते. रोज दोन तास रांगेत उभे राहून आपला क्रमांक कधी येईल, याची वाट पहावी लागते. याखेरीज दुसरे आयुष्यच उरले नाही. 
- संतोष परब

मी रोज चारकोप, कांदीवली येथून दक्षिण मुंबईत कामासाठी येतो. मला 2 बस बदली कराव्या लागतात. त्याच्यातच तीनेक तास जातात. रेल्वेत प्रवेश दिल्यास फार सोयीचे होईल. 
- संजय पाटील 

आमचा मालक चांगला आहे. आम्ही 8 तास करतो. लॉकडाऊनमध्ये काम बंद असूनही त्यांनी पगार दिला.  मात्र, रेल्वे सुरु नसल्याने आम्हाला बसने प्रवास करण्यातच आमचे सहा तास जातात. त्यामुळे कुटुंबालाही वेळ देता येत नाही. 
- हरिश्चंद्र शहा

खासगी नोकरदारांना  कुटुंब नाही का?  रोज चार ते पाच तास प्रवासात आणि कामाचे आठ तास म्हणजे 13-14 तास हे घराबाहेर राहतात. मग त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? नोकरी केली नाही कुटुंबियांचे पोट पाणी, मुलांचे शिक्षण खर्च कोण करणार? 
सरकार याकडे लक्ष देत नाही. तातडीने रेल्वे सुरु न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. 
- धनराज नाईक,
मनसे विभागध्यक्ष, मलबारहिल

प्रवाशांना आम्ही बसमध्ये रांगेतच सोडतो. सोशल डिस्टनसिंगचे पालन करा, मास्क लावा, अशी विनंती करतो. तरीही काही प्रवासी ऐकत नाही. जबरदस्तीने बसमध्ये शिरतातच. लोकांनी समजून घ्यायला हवे. करोना संसर्गापासून त्यांचा बचाव होणे महत्त्वाचे आहे. 
- प्रवीण केळशिकर,
सहाय्यक वाहतूक अधिकारी, बेस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com