स्कूलबसमालक-चालक मोठ्या संकटात;  गाड्यांच्या हफ्त्यांसह देखभाल-दुरुस्तीचाही भुर्दंड 

शरद वाघदळे
Sunday, 6 September 2020

शाळांसाठी वापरण्यात येणाऱ्या बस, व्हॅन जाग्यावरच उभ्या असल्याने स्कूल बसमालकांचे कंबरडे मोडले असून, गाड्यांचा हप्ता कसा भरायचा, असा प्रश्‍न सतावत आहे.

वाशी ः शाळा आणि शैक्षणिक संस्था लॉकडाऊनमुळे बंद असल्याने स्कूलबसचे चाक थांबले आहे. या बसवर अवलंबून असणाऱ्या चालक, मदतनीस व महिला परिचर यांच्यासमोर आता खायचे काय, असा प्रश्‍न पडला आहे. शाळांसाठी वापरण्यात येणाऱ्या बस, व्हॅन जाग्यावरच उभ्या असल्याने स्कूल बसमालकांचे कंबरडे मोडले असून, गाड्यांचा हप्ता कसा भरायचा, असा प्रश्‍न सतावत आहे. त्यातच बस उभ्या असल्याने त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. 

'खाकी'ने दाखवली भूतदया; पोलिसानी दिले अशक्त पक्ष्याला जीवदान

नवी मुंबईला शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. नवी मुंबईत प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या मोठी आहे. महापालिका कार्यक्षेत्रात सध्या 1000 च्या सुमारास स्कूल बस व व्हॅन धावतात. यातील अनेकांनी बॅंका किंवा इतर वित्त संस्थांकडून व्हॅन खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. टाळेबंदीमुळे यातील स्कूलबसमालकांसह व्हॅनधारकांचे हप्ते थकले आहेत. त्याच्या वसुलीसाठी बॅंकांकडून तगादा सुरू असल्याचे स्कूलबसचालक सांगतात. मागील पाच महिन्यांपासून सर्व बस व व्हॅन जागेवर पडून आहेत. वापर नसल्याने त्या पूर्णत: मोडकळीस आल्या आहेत.

'मातोश्री'वर आलेल्या दुबईच्या कॉल बाबत अनिल परब यांचे स्पष्टीकरण; वाचा काय म्हटले?

अनेक व्हॅनचे टायर व बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे व्हॅनचालक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन व्हॅनचालकांना दिलासा द्यावा. ज्यांचे हप्ते थकले आहेत, त्यांचे व्याज दर माफ करावे, असे स्कूलबस असोसिएशनचे सल्लागार सतोष शेट्टी यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 400 बसचालक, 400 मदतनीस, 400 महिला परिचर यांना या काळात या सगळ्याचा फटका बसला आहे. सुमारे पाचशे चालकांच्या हाताचे काम गेले आहे. 

 

काही शाळांमध्ये पालकांकडून मार्चमध्येच पुढील वर्षाचे शुल्क घेतले आहे; मात्र बसचालकांना पगार अदा केला नाही. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करता भविष्यात बस चालवणेही कठीण होणार आहे. सरकारने मदतीचा हात द्यावा. 
- संतोष शेट्टी,
सल्लागार, स्कूलबस असोसिएशन

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School bus owner-driver in big trouble Maintenance of repairs