
अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी "वन डे' ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या "मिनी ट्रेन'मधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शविली आहे. यातून मध्य रेल्वेच्या महसुलात 33 लाख 26 हजारांची भर पडली आहे.
मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. अनेक महिने घरात कोंडून राहावे लागल्यामुळे सर्वांना बाहेरच्या ठिकाणी फिरण्याचे वेध लागले होते. त्यामुळे अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी "वन डे' ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या "मिनी ट्रेन'मधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शविली आहे. यातून मध्य रेल्वेच्या महसुलात 33 लाख 26 हजारांची भर पडली आहे.
थंडीत माथेरानला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यासह दिवाळी, नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी माथेरान गाठले होते. माथेरानमधील वेगवेगळी स्थळे बघण्यासाठी पर्यटक आतुरलेले असतात. सध्या माथेरान स्थानकापासून ते अमन लॉज मिनी ट्रेनमधून पर्यटक प्रवास करत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिनी ट्रेनची वाहतूक बंद होती; मात्र नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सुरू झाली. सुरुवातीला अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवेच्या दिवसाला चार फेऱ्या सुरू करण्यात आल्या. दिवाळीनंतर मध्य रेल्वेने दिवसाला 12 फेऱ्या सुरू केल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महसुलात लाखोंची भर पडली.
नोव्हेंबर- 16 हजार 946- 11 लाख 38 हजार 157 रुपये
डिसेंबर- 28 हजार 186- 17 लाख 31 हजार 567 रुपये
एकूण- 45 हजार 132- 28 लाख 69 हजार 724 रुपये
माथेरान मिनी ट्रेनला नववर्षात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिनी ट्रेनमधून 7 हजार 557 प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर यातून 4 लाख 91 हजार 298 रुपयांची भर मध्य रेल्वेच्या तिजोरीत पडली आहे.
mini train of Matheran popular among tourists in winter session
------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )