esakal | Virar Hospital Fire : मृतांच्या नातेवाईकांनी मंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

आयसीयूमध्ये 17 रुग्ण उपचार घेत होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला असून 4 गंभीर रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं आहे.

Virar Hospital Fire - मृतांच्या नातेवाईकांनी मंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

विरार : कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पहाटे ३ च्या सुमारास घडली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, घटनास्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांना मृतांच्या नातेवाईकांनी घेरलं होतं. घटनास्थळी शिंदे यांनी जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांसह पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, ही घटना दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. एसीमध्ये शॉर्टसर्कीट झाल्यानं स्फोट झाला आणि आग भडकली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. याची चौकशी होईल असंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, विरार रुग्णालयात झालेली दुर्घटना कशामुळे झाली याची चौकशी होईल. तपास करण्यात येणार असून यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. निष्काळजीपणा केलेल्यांवर कारवाई करण्यात येईल. जे होऊ नये ते घडलं असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा: Virar Hospital Fire: १३ मृतांची नावे आली समोर

आयसीयूमध्ये 17 रुग्ण उपचार घेत होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला असून 4 गंभीर रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं आहे. इतर रुग्णांची प्रकृती गंभीर नाही. रुग्णालयात एकूण 70 रुग्णांवर उपचार सुरु होते. सध्या 20 रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यांना दहीसरच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

फायर सिस्टिमबाबत काळजी घ्यायला हवी होती ती घेतली गेली नाही. त्याची चौकशी होईल. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत आदेश दिले आहेत. सध्या रुग्णांना हलवणं आणि त्यांचे जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. चार रुग्ण गंभीर होते त्यांना इतरत्र दाखल करण्यात आलं अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.