पूरामुळे जेईई परीक्षा देऊ न शकलेल्या त्या विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंत सरसावले; म्हटले की 'काळजी करू नका...

तुषार सोनवणे
Tuesday, 1 September 2020

राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचे विधान केले आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी उदय सामंत यांनी याविषयावर संवाद साधला आहे.

मुंबई - विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे, कोरोना काळातील कठीण दिवसांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे येथील नागरिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. त्यातच पूरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट या परिक्षांना मुकावे लागले आहे. या विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचे विधान केले आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी उदय सामंत यांनी याविषयावर संवाद साधला आहे.

पूर असला तरी जेईई परीक्षा होणारच! उच्च न्यायालयाने मागणी केली अमान्य;  विद्यार्थ्यांना दिला हा पर्याय

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहरांमध्ये जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांची परिक्षा केेद्रे होती. सध्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळाधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक गावांचा शहरांशी थेट संपर्क तुटला आहे. काही विद्यार्थ्यांची घरे पुराच्या पाण्याने वेढली गेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचणे अडचणीचे ठरू शकते. ते परिक्षा देऊ शकत नाही. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय  राज्यमंत्री संजय धोत्रे यांना दिली आहे. त्याच्यांतील संवादानंतर, 'विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही' असा विश्वास सामंत यांनी दिला. 

खासगी रूग्णालयांवरील सरकारचे नियंत्रण संपूष्टात? सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव रखडला

दरम्यान, पूर्व विदर्भातील पूर परिस्थिती बघता शैक्षणिक कार्यकर्ता नितेश बावनकर यांनी येथील विद्यार्थ्यांची जेईई पुढे ढकलण्यात यावी अशा आशयाची याचिका सोमवारी (ता.31) उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मागणी अमान्य करीत आजच परीक्षा घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते. याशिवाय जे विद्यार्थी पूरपरिस्थितीमुळे जेईई देऊ शकले नाहीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा असे निर्देश देत, केंद्र आणि राज्य सरकार याबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले. आता विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार मिळून काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Uday Samant moved for those students who could not appear for the JEE examination due to floods; Said Dont worry ...