कोट्यवधी खर्चूनही मिठी नदी अस्वच्छच | mithi river polluted even after spending crorers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mithi river

हजार कोटी रुपये खर्च झाले; पण मिठी नदी अजूनही अस्वच्छच

मुंबई : ६ जुलै २००५ सालापासून आजमितीस मिठी नदीच्या सुशोभीकरण आणि विकासाच्या नावाखाली १ हजार १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र सांडपाणी आणि रसायनयुक्त पाण्याच्या उत्सर्जनामुळे मिठी स्वच्छ करण्यात प्रशासनाला आजतागायत अपयश आले आहे. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडविले जाणार असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेने दिली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करावे,

गलगली यांनी मिठी नदीमध्ये दोन्ही बाजूंकडून उत्सर्जित होणाऱ्या सांडपाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत पर्जन्य जल वाहिनी विभागाचे उप प्रमुख अभियंता विभाष आचरेकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की मुंबई महानगरपालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सल्लागार मे. फ्रिशमन प्रभू यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे सुचविली आहेत.

हेही वाचा: मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता ‘अ-प्रदूषित’ श्रेणीत

सल्लागाराने सुचविलेल्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत फिल्टरपाडा, पवई ते डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड दरम्यान नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून ते मिठी किनाऱ्यालगत नियोजित मलनिःसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेऊन डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड येथे प्रस्तावित मलशुध्दीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित केले आहे. हे काम सद्य:स्थितीत प्रगतीपथावर मे २०२२पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

पुढे अशी माहिती दिली की सल्लागाराने सुचविलेल्या दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत गट क्र. 2 अंतर्गत, मुख्यतः (भरती प्रवण क्षेत्र वगळता) छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे इत्यादी कामांचा अंतर्भाव आहे. ही कामे डिसेंबर २०२३पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

भरती प्रवण क्षेत्रातील मिठी नदी व वाकोला नदीत विविध पातमुखांद्वारे उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदी व वाकोला नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे, फ्लड गेट बांधणे, उदंचन पंप बांधणे, कठडे बांधणे इत्यादी कामांचा प्रादुर्भाव आहे. या कामाची निविदा प्रकिया प्रगतीपथावर आहे.

Web Title: Mithi River Polluted Even After Spending Crorers Bmc To Stop Pollution

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BMCMithi River
go to top