Rohit Pawar : शरद पवारांना डिवचल्यावर काय होतं हे त्यांना समजेल - आमदार रोहित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar over ekanth shinde shrikant shinde tease sharad pawar ncp politics

Rohit Pawar : शरद पवारांना डिवचल्यावर काय होतं हे त्यांना समजेल - आमदार रोहित पवार

डोंबिवली - राष्ट्रवादीमध्ये हात घालून त्यांनी शरद पवार यांना डिवचले आहे. पवारांना डिवचल्यावर काय होतं, हे आता त्यांना समजेल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे. तर ठाणे जिल्ह्यातील विकास कामांवरून इथली जनता नाराज आहे असे सांगत अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. शिंदे यांना देखील लक्ष केले.

कल्याण दौऱ्या दरम्यान उल्हासनगर येथील पप्पू कलानी यांची रोहित यांनी भेट घेतल्याने देखील एकच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने कल्याण मधील स्प्रिंग टाईम सभागृहात आमदार रोहित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे, जिल्हा अधिक्षक सचिन पोटे, विकास लवांडे, वंडार पाटील, सचिन बासरे, रवी कपोते, अंकुश जोगदंड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. रोहित पवार कल्याण मध्ये लोकलचा प्रवास करून आले.

आपल्या भाषणाची सुरवातच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडी यावर झोड घेत केली. बांद्रा वरून निघालो तेव्हा फार जोश मध्ये होतो. गुगल मध्ये पाहिलं किती वेळ लागेल, तेव्हा समजलं साडे 3 तास लागतील.

मग लोकलचा पर्याय निवडला. एककिडे एसी गाडी होती निवांत बसून येता आलं असत, जस सरकार आहे आताच. तर दुसरीकडे प्रवासात संघर्ष होता. तो संघर्ष मी निवडला. लोकांच्या हितासाठी लढायचं अशी ही लोकल आम्ही निवडली.

लोकल ने येत असताना ठाणे, कल्याण येथील नागरिक भेटले. त्यांनी आमच्याशी संवाद साधताना सांगितले, आमच्या भागात मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, मुख्यमंत्री यांचे सुपुत्र येथील खासदार आहेत. पण विकासाच्या बाबतीत बघितले तर त्या लेव्हलचा विकास कुठेही होताना दिसत नाही, असं लोक बोलतात.

आरोग्य, महिलांवर होणारे हल्ले, वाहतूक कोंडी विषयी लोकांनी सांगितले. इथे फक्त भिंती रंगवल्या जातात हे सुद्धा त्यांनी सांगितले. रोड नीट करण्याच्या नावाखाली चांगले रस्ते उखडले जातात. अशा सगळ्या गोष्टी लोकांकडून आम्हाला समजल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीत एवढेच सांगतो की इथली जनता नाराज आहे. असे म्हणत रोहित यांनी मुख्यमंत्री शिंदे क खासदार शिंदे यांच्यावर टिका केली.

इंडिया आघाडीविषयी बोलताना ते म्हणाले, भाजप इंडिया ला घाबरला आहे. देशात इंडियाचे आमदार भाजप पेक्षा जास्त आहे. सध्या काही सर्व्हे देखील येत आहेत, या सर्व्हेमध्ये त्यांचा आकडा 40 च्यावर जात नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी फोडली.

लोकसभेत सत्तेला भाजप व शिंदे गट मिळून 40 च्या पुढे त्यांचा आकडा जात नव्हता, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी मध्ये हात घातला. राष्ट्रवादी मध्ये हात घालून त्यांनी पवार यांना डिवचले आहे, पवार यांना डिवचल्यावर काय होत ते त्यांना आता समजेल असा इशारा रोहित यांनी भाजपला दिला आहे. त्यासाठी संघटन हे महत्वाचे असल्याचे सांगत रोहित यांनी आघाडी मधील कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचा सल्ला दिला.

मराठी माणसे स्वाभिमानासाठी कधीही दिल्ली पुढे झुकत नाही. ही लढाई अस्मितेची आहे असे म्हणत, या शहरात, जिल्ह्यात आपल्या विचारांच सरकार कस येईल हे पाहिलं पाहिजे. सत्तेत आम्ही जाऊ शकलो असतो, संधी होती. उद्धव ठाकरे यांच्याकडे संधी होती भाजप सोबत जाण्याची, शरद पवार यांच्याकडे संधी होती रिटायर्ड व्हायची पण ते झाले नाहीत. ते स्वतःचा नाही तर भावी पिढीचा विचार करतात असे सांगितले.

ओबीसी आरक्षण प्रश्न का निर्माण झाला भाजपमुळे झाला. त्यांना मुंबई वर राज करायचं आहे. मुंबईत सत्ता आणण्यासाठी ओबीसी आरक्षण हा प्रश्न कोर्टात प्रलंबित ठेवला आहे असे रोहित म्हणाले. येत्या काळात नवीन चेहऱ्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळू शकते असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण केला.

आमदार पवार यांनी लोकलचा प्रवास करत कल्याण गाठले. कल्याण मधून उल्हासनगर येथे जात त्यांनी पप्पू कलानी व ओमी कलानी यांची प्रथम भेट घेतली. कलानी यांच्या भेटीमुळे आतापर्यंत पप्पू कलानी हे कोणत्या गटात हे चित्र स्पष्ट होत नव्हते, या भेटीमुळे शरद पवार यांच्यासोबत कलानी असल्याची एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बीआरएस महाराष्ट्र मध्ये फिरत होतं, शिरकाव करण्याच्या प्रयत्न करत होता. पण त्याच राज्य धोक्यात आले तिथे काँग्रेस येण्याची शक्यता असल्याने त्यांना समजले आहे त्यांनी तिकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे आता इकडे लागलेले मोठे बॅनर फाटले तरी त्यांना माहीत नाही.

आगरी कोळी बांधवांनी दिलेली टोपी परिधान करून रोहित पवार यांनी भाषण केले. या दौऱ्यात रोहित पवार यांनी कल्याण मधील शिवसेना शाखेला भेटी देत शिवसैनिकांची भेट घेतली. मला अजित दादा व्हायचं पण नाही. अजित दादा मोठे नेते आहे मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलो नाही, विचार जपण्यासाठी आलेलो आहे.

पुण्यातील लोकसभा आम्ही सर्वात जास्त मताने निवडून येऊ असं बावनकुळे म्हटले होते याला उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले, आतापर्यंत निवडणूक का लागली नाही याचे उत्तर चंद्रकांत बावनकुळे यांनी द्यावं.

तुमचे सगळे सर्व्हे तुमच्या विरोधात जातात म्हणून तुम्ही शांत बसले आहात. कसबा निवडणूक वेळी जेव्हा केव्हा आम्ही लढू तेव्हा जास्त बहुमताने निवडून येऊ असं तुम्ही बोलले होतात आणि कसब्याचे काय झाले आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला आहे.

30-40 वर्ष लढणारी फळी अचानक भाजप सोबत जात असेल आणि आम्ही दुसऱ्या तिसऱ्या लाईनमध्ये असणारे कार्यकर्ते जर अचानक पुढच्या लाईनीमध्ये येत असून आणि लढत असताना भूमिका जर घेत असो ही भूमिका घेत असताना काही लोकांना जर वाटत असेल आम्ही नेते बनतो तर ते चुकीच आहे. त्यांना फक्त नेतेच माहिती आहेत. आम्हाला कार्यकर्ते लोक माहित आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून लढत राहू आम्हाला कुठेही नेता बनण्याची घाई नाही.