esakal | राज्य आणि केंद्राबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणालेत...
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य आणि केंद्राबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणालेत...

केंद्र व राज्यसरकार चांगले काम करत आहे, लढाईतील सर्वांचे कौतुक : राज ठाकरे

राज्य आणि केंद्राबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणालेत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासन दोन हात करत आहेत, बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे ह्या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत आणि आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे. ह्याबद्दल ह्या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचे जेवढे कौतुक कराववे ते कमीच आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, कल्याणमध्ये तर 6 महिन्याची मुलगी ह्या आजारातून बरी होऊन घरी आली, तिच्यासारखे हजारो लोक ह्या आजारावर मात करून बाहेर पडले आहेत हे दिलासादायक आहे. पण ह्या आकडेवारीला ना सरकारी पातळीवर पुरेशी प्रसिद्धी दिली जात आहे ना माध्यमांमध्ये ह्यावर चर्चा होताना दिसत आहे. कालच मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याशी बोलून ही बाब त्यांच्या देखील निदर्शनास आणून दिली. 

Coronavirus : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण

कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल. अर्थात आजार नियंत्रणात आहे हे दाखवले गेले तर नागरिक लगेच बाहेर पडतील असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे आणि 3 मे पर्यंतच्या लॉकडाऊनचे लोक पालन करतील याविषयी शंका नाही. 

याच्याशी निगडित दुसरा भाग म्हणजे एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे असे जरी आढळले तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा तर आहेच पण तो आपल्या सर्वांना नुकसानकारक ठरेल. ह्या आजाराच्या नुसत्या शंकेने सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील तर लोकांचा कल त्याची लक्षणे लपवण्याकडे राहील आणि पर्यायाने लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील. हा आजार संसर्गजन्य आहे हे मान्य पण टी.बी. सारखे अनेक आजार हे संसर्गजन्य असताना देखील आपण त्या रुग्णांना वाळीत टाकले नाही तर आत्ताच हे का, असा सवाल राज यांनी केला. 

गलथान कारभार ! ३० तास रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये पाहिली बेडसाठी वाट; मग मिळाले कोरोनाग्रस्त महिलेला उपचार...

यावर एकच उपाय म्हणजे या आजारावर मात केली जात आहे, रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत याचे आकडेवारी देणारे एक 'न्यूज बुलेटिन' आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने जारी करावे. माध्यमांनी देखील ह्या मुद्द्याच गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज पुढे म्हणाले की, माझें पुन्हा एकदा जनतेला आवाहन आहे की घाबरून जाऊ नका, पुरेशी काळजी घ्या आणि समाजमाध्यमांवर येणाऱ्या गोष्टींची नीट खातरजमा करा, त्यावर सरसकट विश्वास ठेऊन कोणतीही आततायी कृती करू नका. या सगळ्यावर मात करून लवकरच जनजीवन पूर्ववत व्हावे हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. 

MNS chief raj thackerays big statement about state and central government

loading image