
राज ठाकरेंच्या पत्रानंतर बाळा नांदगावकर तातडीने गृहमंत्र्यांच्या भेटीला
मशिदींवरच्या भोंग्यांच्या संदर्भात मनसेच्या आंदोलनानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. यावरूनच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संतप्त शब्दांत पत्र लिहिलं आहे. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाहीये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही. अशा स्पष्ट शब्दात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. त्यानंतर आज मनसे नेते बाळा नांदगावकर हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट घेतली आहे. (Bala Nandgaonkar Meets Dilip Walse Patil)
हेही वाचा: सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाहीत; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या भेटीदरम्यान भोंग्याच्या आंदोलनानंतर मनसैनिकांवर होणाऱ्या कारवाईबद्दल गृहमंत्र्यांशी चर्चा केली आहे. कालच राज ठाकरे यांनी ट्विट करून पोलीस कारवाई बाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर नांदगावकर आता पुन्हा राज ठाकरे यांच्याशी चर्चा करतील.
राज ठाकरे यांनी मनसैनिकांच्या धरपकडीबाबत भाष्य करणारं एक पत्र कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी राबवली होती का? आमच्या कार्यकर्त्यांना पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा हैद्राबाद संस्थानातल्या 'रझाकार'प्रमाणे पोलीस शोधत आहेत. दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कोणी दिलेत हे सर्वांना माहित आहे असा उल्लेख करत त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Web Title: Mns Leader Bala Nandgaonkar Meeting With Dilip Walse Patil Raj Thackeray Uddhav Thackeray Cm
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..