
‘सत्ता येत - जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही…’
सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाहीत; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून सुरु असलेल्या धरपकडीवरुन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतापले आहेत. ‘सत्ता येत - जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही…’ असे खडे बोल त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सुनावले आहे. मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ४ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिल्यानंतर गृह विभागाने मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केल्याबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
राज ठाकरे या पत्रात म्हणतात, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम’ राज्य सरकारने किंवा पोलिसांनी राबवली होती का, आमच्या कार्यकर्त्यांना पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा हैद्राबाद संस्थानातल्या ‘रझाकार’ प्रमाणे पोलिस शोधत आहेत. दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत, सर्वांना माहित असल्याचा उल्लेख करत शिवसेनेचे नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सहनशीलतेचा अंत पाहू नका
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी भोंगे उतरवा आंदोलन सुरु केले. त्यापूर्वीच २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या. हजारोंना तुरुंगात डांबले.राज्य सरकार पोलीसांचा वापर करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशाराही दिला.
Web Title: Raj Thackeray Letter To Chief Minister Uddhav Thackeray Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..