कशाला त्या नोटा व फोटोंच्या मागे लागलाय ? सामान्यांना याचा काय फायदा ? ; राजू पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MlA Raju Patil

कशाला त्या नोटा व फोटोंच्या मागे लागलाय ? सामान्यांना याचा काय फायदा ? ; राजू पाटील

डोंबिवली - देशातील विविध राजकीय पक्षांकडून भारतीय चलनी नोटांवर कोणाचे फोटो असावे या मुद्द्यावरून चांगलेच राजकारण रंगले असताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करता सर्वच पक्षांना फटकारले आहे. फालतू राजकारण असे ट्विट करत आमदार पाटील यांनी 'सामान्यांना याचा काय फायदा ? उगीचच कशाला त्या नोटा व फोटोंच्या मागे लागलाय ? असे लिहीत सामान्यांना भेडसावणारे प्रश्न मांडत त्याकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधू केले आहे.

निवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज लावणं कठीण आहे. गुजरात निवडणुकीच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा केजरीवाल पुढे घेऊन जातायेत, असे संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे राम कदम यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावावा अशी मागणी ट्विट करत केली आहे.

भारतीय चलनी नोटांवरील फोटोंवरून होणारे हे राजकारण पाहता कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेले ट्विट आता चर्चेत आले आहे. त्यांनी कोणत्या नेत्याच्या फोटो ची मागणी केली असे वाटत असताना आमदार पाटील यांनी मात्र या सुरू असलेल्या राजकारणावरून #फालतू राजकारण असे म्हणत सर्वच पक्षांना फटकारले आहे.

काय आहे ट्विट

सध्याचे राजकारण पाहून जनता #NOTA

वापरायच्या मुड मध्ये आहे. त्यामुळे महागाई कमी करा,शेतकरी बांधवांना दिलासा द्या, रस्ते चांगले करा,चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा,रूपया मजबूत करा. उगीचच कशाला त्या नोटा व फोटोंच्या मागे लागलाय ? सामान्यांना याचा काय फायदा ? #फालतू_राजकारण