बंड झाले, आता थंड झाले?; मनसे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला

सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही
Eknath Shinde
Eknath Shindeesakal

डोंबिवली - महाराष्ट्रात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले आहे. सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. दुसरीकडे राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत संपली असून त्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासकीय राजवट पालिकांत लागू असली तरी तेथील विकास कामांकडे अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याने स्थानिक पातळीवर सोयी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. केडीएमसीमध्ये गेल्या अडीच वर्षापासून प्रशासकीय राजवट असून रस्त्यांवर खड्डे, वाहतूक कोंडी, कचरा यांसारख्या अनेक समस्यांकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष झाल्याने कामांचा बोजवारा उडाला आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते, त्यांचे या समस्येकडे लक्ष जावे यासाठी बंड झाले, आता थंड झाले असे ट्विट करत मनसे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधू केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता राहीली आहे. मात्र तरीही विकास कामांच्या बाबतील कल्याण डोंबिवतील बोंब असल्याचे दिसून आले आहे. बेकायदा बांधकामे, वाढत्या नागरि समस्या यांसोबतच शहरातील कचरा, रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी या समस्या नागरिकांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. विरोधी पक्ष म्हणून मनसेने याविषयी वारंवार आवाज उठवित सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. गेल्या अडिच वर्षापासून पालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर मात्र या समस्यांकडे साऱ्यांचाच कानाडोळा झाल्याचे पहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी आवाज उठवून, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे याविषयी तक्रारी करुनही अधिकारीही ढिम्म हलत नसल्याचेच दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेताच त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रथम प्राधान्य देत खड्डे बुजविण्याचे सर्व पालिकांना आदेश दिले आहेत. मात्र केडीएमसी अधिकारी त्यालाही गांर्भियाने घेताना दिसत नाही. शहरातील अनेक रस्त्यावर प्रचंड खड्डे असून सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविले जातील असे आवाहन पालिकेतील नवनियुक्त आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केले आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून त्या अनुषंगाने कोणत्या हातलाची दिसत नाही.

मनसे आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार असून कल्याण डोंबिवली महापालिकेतच हा मतदार संघ येतो, मात्र 27 गाव आणि 18 गावांच्या रखडलेल्या विषयामुळे प्रशासनाने फारशी कामे या परिसरात केली नाहीत जी काही कामे आहेत, ती आमदार आणि खासदार निधीतून होत आहेत. ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था व कचऱ्याची गंभीर समस्या आहे. तत्कालीन आयुक्त सूर्यवंशी यांनी याकडे फारसे गांर्भियाने न पाहिल्याने आता हा प्रश्न वाढला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. दांगडे कल्याण ग्रामीण मतदार संघात लक्ष घालणार का आणि येथील समस्या सोडविणार का ? हे पहावे लागेल.

या सर्व परिस्थितीचा आढावा घेता मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष नागरि समस्यांकडे वेधू केले आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट...

बंड झाले,आता थंड झाले ?

पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे.तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ? @mieknathshinde

राज्यातील सत्ता आणि राज्यकीय समीकरण बदल्याने कल्याण-डोंबिवली शहरातील समस्याकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नविन सत्तासंघर्षात भाजपा, शिंदे गट आणि मनसे एकत्र आल्याने आता कल्याण डोंबिवलीत विरोधी पक्षच उरलेला नाही. त्यामुळे आपल्या व्यथा मांडायच्या तरी कोणाकडे असा सवाल नागरिकांना पडला आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि आप या पक्षांनी नागरी समस्यांना धरुन आंदोलन केली असली तरी स्थानिक समस्यांवर ही आंदोलने फारशी झालेली नाहीत. सत्ताधाऱ्यांना साथ दिली असली तरी मनसेने नागरिकांच्या समस्येसाठी आपला विरोधी बाणा सोडलेला नाही हेच आमदार पाटील यांनी आपल्या ट्विट मधून दाखवून दिले आहे. लोकांचे सण आले.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मनसे आता पुन्हा स्थानिक पातळीवर विरोधीपक्ष म्हणून सक्रिय होते का हे पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com