esakal | Modi Cabinet reshuffle: सरपंच ते भावी मंत्री, कसा आहे कपिल पाटलांचा राजकीय प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil-Patil

Modi Cabinet reshuffle: सरपंच ते भावी मंत्री, कसा आहे कपिल पाटलांचा राजकीय प्रवास

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात काही फेरबदल (Modi Cabinet reshuffle) केले असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातून चार जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. यात भिवंडीचे खासदार कपिल पाटील (kapil patil) आहेत. खासदारकीच्या दुसऱ्याच टर्ममध्ये (second term) कपिल पाटलांना थेट मंत्रिपद (minister) मिळणार असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण कपिल पाटील यांची मंत्रिपदावर लागणारी वर्णी हे त्यांनी केलेल्या मेहनतीच फळ आहे. त्याशिवाय ठाणे जिल्ह्यातील भाजपाची पक्षविस्ताराची समीकरणही त्यामागे आहेत. (Modi Cabinet reshuffle Know about political journey of bhiwandi bjp mp kapil patil)

कसा आहे कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास?

कपिल पाटील भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे. सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही भूषवलं. पण २०१४ लोकसभा निवडणुकीच्याआधी त्यांनी भाजपात (bjp) प्रवेश केला. २०१४ मध्ये भाजपाच्या तिकिटावर मोदी लाटेत ते सर्वप्रथम भिवंडीतून खासदार (Bhiwandi Mp) झाले. त्यानंतर २०१९ मध्येही त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाकाजात गती असल्यामुळे भाजपामध्ये त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मुंबई विद्यापीठातून बी एची पदवी मिळवली आहे.

हेही वाचा: BLOG: वार झेलणारा शिवसैनिक आता शिवसेनेविरोधातच उभा ठाकणार?

मंत्रीपद देण्यामागे काय आहेत राजकीय समीकरण ?

कपिल पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत असल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत असेल. पण त्यामागे भाजपाची स्थानिक समीकरण आहेत. आगामी महापालिका निवडणूक आणि पक्षविस्तार हे दोन उद्देश भाजपासमोर आहेत. ठाणे जिल्ह्यावर सध्या शिवसेनेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. या वर्चस्वाला भाजपाला शह द्यायचा आहे. त्या दृष्टीने कपिल पाटील हे सध्याच्या घडीचा भाजपाकडे असलेला आश्वासक चेहरा आहे.

हेही वाचा: दुबईवरुन परतलेल्या तरुणीची आत्महत्या, प्रियकर आणि त्याच्या पत्नी विरोधात तक्रार

ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची पकड आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. शिंदेंची पकड कमी करुन, भाजपाचा विस्तार हे लक्ष्य कपिल पाटील यांच्यासमोर आहे. कपिल पाटील सध्या पक्षविस्तारासाठी मेहनत घेतच आहेत. पण मंत्रीपद मिळाल्यास त्यांना आणखी बळ मिळू शकते.

नवी मुंबई विमानतळाला शेकापचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून आगरी समाज आक्रमक झालेला आहे. कपिल पाटील यांना मंत्री करण्यामागे आगरी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हेतू असू शकतो. आगरी समाज शिवसेनेवर नाराज आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादात रायगड जिल्ह्यात पडद्यामागून भाजपाचे नेते आघाडीवर आहेत. आता ठाण्यातही तशाच पद्धतीने कपिल पाटील यांच्या रुपाने नेतृत्व उभं करण्याचा भाजपाचा प्रयत्न असू शकतो.

loading image
go to top