घटनेला पायदळी तुडवूनच मोदी सरकारचा कारभार; खासदार हुसेन दलवाई यांची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क 
Friday, 27 November 2020

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त जनतेला संविधानाचे पावित्र्य राखण्याचा शहाजोगपणाचा सल्ला दिला आहे. घटना अस्तित्वात आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचा परिवार सोडता देशातील जनता घटनेचे पावित्र्य निष्ठेने सांभाळत आहे.

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त जनतेला संविधानाचे पावित्र्य राखण्याचा शहाजोगपणाचा सल्ला दिला आहे. घटना अस्तित्वात आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचा परिवार सोडता देशातील जनता घटनेचे पावित्र्य निष्ठेने सांभाळत आहे. सत्तेत आल्यापासून राज्यघटनेला पायदळी तुडवत कारभार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री, नेते व कार्यकर्त्यांना घटनेचे पावित्र्य राखण्याचा सल्ला द्यावा, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. 

हेही वाचा - सायन रूग्णालय परिसरात गॅस गळती; सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

दलवाई म्हणाले की, घटनेच्या पावित्र्यासंदर्भात पंतप्रधानांचे वक्तव्य म्हणजे "लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण', अशा प्रकारचे आहे. गेल्या सहा वर्षांतील मोदी सरकारचा कारभार पाहता ते स्वतः आणि देशाच्या विविध राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री संविधानाला हरताळ फासून हुकूमशाही वृत्तीने सरकारे चालवत असल्याचे दिसून येते. कोणी काय खावे? कोणी कोणता पेहराव करावा? कोणी कोणावर प्रेम करावे? आणि कोणी कोणाशी लग्न करावे? याचे स्वातंत्र्य घटनेने लोकांना दिले आहे; मात्र भाजपचे नेते व विविध राज्यांतील भाजपची सरकारे लोकांच्या खासगी बाबतीत नाक खुपसून दररोज घटनेला पायदळी तुडवत आहेत. त्यांचे कान मोदी पकडत नाहीत, त्यामुळे या सर्वांना त्यांचा मूक पाठिंबा आहे असे दिसते, असा आरोपही दलवाई यांनी केला. 

हेही वाचा - अलिबाग एसटी स्थानक लाल फितीत; भूमिपूजनाच्या सव्वा वर्षानंतरही कामाला मुहूर्त नाही

...तर कारवाई केली असती! 
नरेंद्र मोदी यांना खरेच घटनेच्या पावित्र्याची काळजी असती; तर दररोज घटनाविरोधी वक्तव्ये आणि कृत्ये करणाऱ्या आपल्या पक्षाची सरकारे व नेत्यांवर त्यांनी काही कारवाई केली असती. प्रत्यक्षात मोदी स्वतः घटनेचे पावित्र्य राखतात, असे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दिसलेले नाही. त्यामुळे मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे वेगळे आहेत, असा टोला दलवाई यांनी लगावला. 
Modi governments administration by trampling on the incident by husen dalawai 

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi governments administration by trampling on the incident by husen dalawai