आई अन् नवजात चिमुकलीची कोरोनावर मात, वाचा प्रेरणादायी लढा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

महापालिकेच्या वाशी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेपासून जन्माला आलेल्या चिमुकलीने आश्चर्यकारकरीत्या कोरोनावर मात केली आहे. माता कोरोनाबाधित असतानाही या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली नाही.

नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेपासून जन्माला आलेल्या चिमुकलीने आश्चर्यकारकरीत्या कोरोनावर मात केली आहे. माता कोरोनाबाधित असतानाही या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली नाही. महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि महिला सेविकांनी घेतलेल्या विशेष खबरदारीमुळे मातेचीही काही दिवसांत कोरोनातून सुटका झाली आहे. सोमवारी या दोघींना डिस्चार्ज देताना डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले.

महत्वाची बातमीधारावीपेक्षा 'या' वॉर्ड मध्ये आहेत अधिक कोविड रुग्ण

घणसोली येथील कोरोना पॉझिटिव्ह असणारी एक गर्भवती महिला वाशी सेक्टर 10 येथील नवी मुंबई महापालिकेच्या डेडिकेटेड कोव्हीड-19 रुग्णालयात 5 एप्रिलला अॅडमीट झाली होती. ही महिला 9 महिन्यांची गर्भवती असून, तिचे प्रसूतीचे दिवस जवळ आले होते. अशा परिस्थितीत महापालिकेच्या रुग्णालयात ही महिला दाखल झाल्यामुळे प्रसूती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते; मात्र 6 एप्रिलला महिलेला प्रसूती वेदना येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या महिलेची डॉक्टरांच्या चमूने अत्यंत सुव्यवस्थितरित्या प्रसूती केली. या महिलेच्या ह्रदयविषयी गुंतागुंतीची स्थिती असतानाही अत्यंत सुरक्षित पद्धतीने ही प्रसूती डॉक्टरांनी पार पाडली. याबाबत महापालिका वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले.

हे ही वाचा#VIDEO : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या टीकटॉक्यांना पोलिसांचा इंगा

प्रसूतीनंतर जन्माला आलेल्या बाळाची पालिकेने कोव्हिड-19 चाचणीसाठी नमुने पाठवले; परंतु सुदैवाची बाब म्हणजे महिलेच्या बाळास कोरोनाची लागण झाली नसल्याचे दोन वेळा केलेल्या तपासणीत सिध्द झाले. प्रसूती झालेल्या महिलेच्याही दोनवेळा तपासणी करण्यात येऊन ती पाॅझिटिव्हची निगेटिव्ह झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला ज्या अवस्थेत पालिका रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर तिची प्रसूती आणि बाळाला कोरोना होऊ नये म्हणून डॉक्टर तसेच परिचारिका आणि महिला सेविकांनी घेतलेल्या विशेष काळजीमुळे माता आणि बाळ दोघांनीही अल्पावधीत कोरोनाला हरवले. त्यामुळे या महिलेस वाशी रुग्णालयातून बाळासह घरी पाठवताना टाळ्यांच्या गजरात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. त्या वेळी या महिलेसह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले.

नक्की वाचापनवेलमध्ये रिक्षावर बसून फिरतोय कोरोना रुपी राक्षस, पहा व्हिडीओ

कोरोनाविरोधातील लढाई मनाशी जिद्द बाळगली तर आपण निश्चित जिंकू शकतो हे त्या नवजात बालकाने आणि तिच्या आईने दाखवून दिले आहे.

 

 Mom and girl defeated Corona, read inspirational fight


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mom and girl defeated Corona, read inspirational fight