पावसाळ्यातील आरोग्य मिशन

पावसाळ्यातील आरोग्य मिशन

पालघर, ता. ११ (बातमीदार) : पावसाळा आला की नागरिकांच्या आरोग्याशी निगडित समस्या डोके वर काढू लागतात. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पावसाळ्यासाठी सज्ज झाला आहे. आरोग्य विभागाने त्यांच्या सर्व यंत्रणा अद्ययावत तयार ठेवल्या आहेत. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पालघर जिल्हा हा सागरी, नागरी व डोंगरी विभागात विभागला गेला आहे. त्या दृष्टीने आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा तयार ठेवण्यात आला आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची आभासी पद्धतीने सभा घेऊन त्यांना तशा सूचना दिल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हाभरात आरोग्याशी निगडित सेवेत कुठल्याही प्रकारची अडचण उद्‍भवू नये, यासाठी जिल्हा मुख्यालयात साथ रोग नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात आले आहे. हा कक्ष संपूर्ण पावसाळ्यात २४ तास सुरू राहणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांची अडचण भासू नये, या दृष्टीने ४६ रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय ठिकाणी राहून सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या विभागात पावसाळी शेतीची कामे मोठ्या प्रमाणात होत असतात. त्या वेळी सर्पदंश, विंचू दंशाच्या घटना घडतात. त्या दृष्टीने प्रत्येक आरोग्य केंद्रात लशीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

माता बाल संगोपन केंद्र
जुलैपासून कुपोषणवाढीचा आकडा सुरू होतो. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाडीसेविका, कर्मचाऱ्यांना बालकांच्या पोषण आहार आणि त्यांच्या औषधोपचार मातांसाठी माता बाल संगोपन केंद्र सज्ज ठेवण्यात यावे, अशा सूचना आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी आढावा बैठकीत दिल्या आहेत.

साथीच्या आजारावर लक्ष ठेवणार
पावसाळ्यातील साथीचे आजार बळावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी साथीचे आजार आणि पूरपरिस्थितीबाबत माहिती घेण्यात येणार आहे. एखाद्या ठिकाणी पूरस्थितीनंतर साथीचे आजार पसरतात. त्या दृष्टिकोनातून माहिती घेण्यात येणार आहे.

पाण्याचे नमुने तपासणार
पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तिथल्या पाण्याचे नमुनेही तपासण्याचा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. विहिरी बोअरवेलच्या पाण्याची क्षमता तपासणी करून टीसीएल पावडर वापरण्यात येत आहे. हे पाणी पिण्यास योग्य की अयोग्य यासाठी ओटी टेस्ट करण्यात येत आहे.

पावसाळ्यात शहरी भागासह किनारपट्टी आणि ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच असतो. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, या अनुषंगाने इन्वर्टर व जनरेटरची सुविधा तयार ठेवण्यात येणार आहेत. तसेच, या कालावधीत कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या घेऊ नयेत, अशा सूचना दिल्या आहेत.
- संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी

पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
* शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत; तसेच ते व्यवस्थित झाकून ठेवावेत.
* हातगाड्यावर, उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाऊ नयेत.
* वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे.
* उलट्या-जुलाब, विषमज्वर वगैरे विकार झाल्यास वेळीच उपचार करावेत.
* कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो, डिसेंट्री, कावीळ रुग्णांवर त्वरित उपचार करावेत.
* पाणी उकळून प्यावे.
* हातपाय स्वच्छ धुणे
* डासांपासून सुरक्षित रहा
* आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी सकस आहार घ्यावा. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते
* त्वचेची काळजी घ्या
* आंबट गोष्टी खाणे टाळावे
* पचनासाठी जड असणारे पदार्थ खाणे टाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com