रिक्षा प्रचारात; प्रवाशांची धावाधाव

रिक्षा प्रचारात; प्रवाशांची धावाधाव

रोहा : विधानसभा निवडणुकीला अवघे चार दिवस असल्याने प्रचारसभा, गावबैठकांना जोर आला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार कार्यकर्त्यांच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांचा उपयोग सुरू आहे. विशेषत: सहाआसनी रिक्षा मोठ्या प्रमाणात त्यांनी आरक्षित केल्या असल्याने जिल्ह्यातील अन्य प्रवाशांचे हाल होत आहेत. ऐन परीक्षेत खोळंबा होत असल्याने विद्यार्थीही त्रस्त झाले आहेत. 

पेण मतदारसंघातील सुतारवाडी भागातील कोलाड ते सुतारवाडी प्रवासासाठी दिवसातून एकच एसटी उपलब्ध असते. त्यामुळे प्रवासी सहाआसनी रिक्षांवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचारासाठी येतील 40 पैकी निम्म्या रिक्षा आणि जीप आरक्षित असल्याने विळे, सुतारवाडी परिसरातून कामानिमित्त, बाजार खरेदी-विक्रीसाठी आणि शाळा- महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल सुरू झाले आहेत. 

रोहा-चणेरा मार्गावरील अर्ध्याहून अधिक रिक्षा प्रचारकार्यात असल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत, असे रोहा तालुका शेतकरी संघटनेचे सचिव गणेश भगत यांनी सांगितले. 

रोहा-चणेरा रस्त्यावरसुद्धा कमी रिक्षा धावत असल्याने त्या भागातसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. खालापूर, कर्जत, महाड, माणगाव आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणीही सध्या हीच परिस्थिती आहे. 


कोलाड ते सुतारवाडीदरम्यान नेहमी 40 रिक्षा धावतात. प्रचारासाठी निम्म्या रिक्षा आरक्षित असल्याने निम्म्याच रिक्षा रस्त्यावर प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. 
-अशोक साळवी, रिक्षाचालक, कोलाड 

परीक्षा सुरू आहे; मात्र रिक्षा वेळेवर मिळत नसल्याने लिफ्ट मागून शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे घरातून लवकर निघावे लागते. 
- अवधूत मालुसरे, विद्यार्थी, कोलाड हायस्कूल 

कोलाड रस्त्यावर एसटीची एकच फेरी होते. रिक्षाही प्रचारात असल्याने प्रवासाचे त्रास होत आहे. -सचिन धोंडगे, प्रवासी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com