Dombivali News : केडीएमसी हद्दीत 7 लाखाहून अधिक वृक्ष; 2 हजार 650 हेरिटेज वृक्ष

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 7 लाखाहून अधिक वृक्षांची नोंदणी करण्यात आली आहे.
Tree
TreeSakal

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 7 लाखाहून अधिक वृक्षांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 265 विविध प्रकारच्या जातीचे वृक्ष आढळून आले असून 2 हजार 650 वृक्ष हे हेरिटेज आढळून आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात वृक्ष संवर्धनासोबतच उद्याने आणि बगीचे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे भविष्यात पालिका क्षेत्रातील हरितपट्ट्यात वाढ झालेली दिसेल अशी आशा पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उद्यान विभाग व खासगी संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षी जून महिन्यात वृक्ष गणनेला सुरवात करण्यात आली आहे. या गणनेतून शहरातील हरितपट्टा वाढविण्याचा विचार प्रशासन करत आहे. विविध भागांतील झाडांची नोंदणी, गणना, संबंधित झाडाची प्रजाती, त्याचा आकार, उंची, ते झाड किती जुनाट आहे याचा अंदाज या गणनेच्यावेळी काढून त्याची सविस्तर नोंद केली जात आहे.

पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी शहरातील पर्यावरण संवर्धनाचा विचार करून शहर परिसरात अधिकाधिक वृक्ष लावून हरितपट्टे वाढविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास खाडी, काळू नदीचा किनारा आहे. या नद्यांच्या काठी वनराई आहे. डोंबिवली परिसरात खारफुटीचे जंगल आहे. हे जंगल भूमाफियांनी बेकायदा चाळी, इमारती बांधून नष्ट करण्यास सुरूवात केली आहे. त्याचे संवर्धन करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.

आंबिवली भागात पालिकेने सहा ते सात हजार झाडे लावून निसर्ग उद्यान विकसित केले आहे. विविध प्रकारची जैवविविधता याठिकाणी पाहण्यास मिळते. कल्याणमध्ये पारनाका परिसरात जुने वड, पिंपळाची झाडे आहेत. गांधारे, बारावे, मोहने, टिटवाळा, आधारवाडी, उंबर्डे, शहाड परिसरत हरित जंगल आहे.

डोंबिवलीत टिळक रस्ता, ठाकुर्ली, चोळे, एमआयडीसी, गांधीनगर, पी ॲन्ट टी कॉलनी भागात अधिक संख्येने जुनाट झाडे आहेत. आयरे, सुनीलनगर, जुनी डोंबिवली, कोपर भागात हरितपट्टे आहेत. वृक्ष गणना अद्याप महिनाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे झाडांच्या संख्येत वाढ होणार आहे, असे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com