भिवंडी रेल्वेस्थानकातून सर्वाधिक पार्सल वाहतूक; 17 फेऱ्यांमधून 2,676 टन माल रवाना

प्रशांत कांबळे
Sunday, 25 October 2020

मध्य रेल्वेमार्गावरील भिवंडी रोड स्थानकावरून लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक पार्सल ट्रेन सोडण्यात आल्या.

मुंबई ः मध्य रेल्वेमार्गावरील भिवंडी रोड स्थानकावरून लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक पार्सल ट्रेन सोडण्यात आल्या. या स्थानकावरून शालिमार, गुवाहाटी, पाटणा आणि इतर राज्यांमध्येही पार्सल गाड्यांच्या फेऱ्या चालविण्यात आल्या. आतापर्यंत सर्वाधिक 17 फेऱ्यांमधून सुमारे 2,676 टन मालाची पार्सल वाहतूक करण्यात आली. 

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त ट्‌विट करणाऱ्याची याचिका न्यायालयाकडून नामंजूर!

10 सप्टेंबर रोजी पहिल्या ट्रेनने 3,879 पार्सलमधून 86.85 टन माल पाठविण्यात आला. आतापर्यंत भिवंडी रोड स्टेशन ते शालिमार, गुवाहाटी, पाटणा आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या पार्सल गाड्यांच्या एकूण 17 फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून 1.74 लाख पार्सलच्या माध्यमातून एकूण 2,676 टन माल पाठविण्यात आल्याचे पश्‍चिम रेल्वेने सांगितले. 18 ऑक्‍टोबर रोजी आझरा, गुवाहाटीला जाणाऱ्या ट्रेनमधून 24,941 पार्सलमधून सर्वाधिक 343 टन माल पाठवण्यात आला. गोदरेज, ओनिडा, एलजी, बजाज, पार्ले-जी, हिंदुस्थान लिव्हर, डेल-मोंटे, मिल्टन इत्यादी ब्रॅण्डचे फर्निचर, फ्रिज, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे, पिशव्या, स्टेशनरी, वंगण तेल आणि सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश आहे. 

पार्सल लोडिंगला चालना देण्याचा प्रयत्न 
रेल्वेने उभारलेल्या बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू) चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेने फ्रेट आणि पार्सल लोडिंगला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भिवंडी रोड स्थानक वस्तू आणि पार्सलसाठी सुरू करणे म्हणजे रेल्वेच्या मालवाहतुकीला चालना देण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे. 

'पोलिस कर्मचारी नाही आता पोलिस अंमलदार म्हणा'; महासंचालकांचे आदेश

प्रवाशांच्या सुविधेतही वाढ 
भिवंडी रोड स्थानक मध्य रेल्वेच्या वसई-दिवा-पनवेल मार्गावर आहे. हे स्थानक उत्तर-दक्षिण रेल्वे वाहतुकीचा जोडणारा बिंदू आहे. जेएनपीटी बंदरालाही ते रेल्वेबरोबर जोडते. 50 हून अधिक गाड्यांना थांबा असलेल्या भिवंडी रोड स्थानकात 5 फलाट असून प्रवाशांच्या हितासाठी तिकीट खिडकी, प्रतीक्षालय, प्रवासी आरक्षण केंद्र, वाहनतळ आदी सर्व सुविधा आहेत. 
--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most parcel traffic from Bhiwandi railway station 2,676 tons shipped in 17 rounds