मोखाड्यातील आमला घाटात डोंगर कोसळला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 August 2019

वाडा ते खोडाळा रस्त्यावरील वाहतूक अनिश्‍चित काळासाठी बंद 

मोखाडा ः मोखाड्यात 10 ते 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील प्रमुख राज्यमार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच वाडा-खोडाळादरम्यान आमला घाटात सुमारे 500 फुटांहून अधिक उंचीवरून डोंगर खाली कोसळला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अनिश्‍चित काळासाठी बंद झाली आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, रुग्ण, चाकरमानी; तसेच भाविकांना याचा मोठा फटका बसला आहे. 

मुसळधार पावसामुळे मोखाड्यातील सर्वच रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत; तर पालघर- वाडा- देवगाव या राज्यमार्गावर 10 ते 12 दरडी कोसळल्या आहेत. त्यातच आमला घाटात सूर्यमाळ सनसेट पॉईंट येथून सुमारे 500 फुटांहून अधिक उंचीवरून डोंगर खाली कोसळला आहे. कोसळलेल्या डोंगराने 150 ते 200 मीटरचा रस्ता व्यापला असून हा डोंगर एक हजार फुटांहून अधिक खोल दरीत कोसळला आहे.

दरम्यान, या मार्गावरून त्र्यंबकेश्वर, नाशिक, वणी आणि शिर्डी या तीर्थक्षेत्रांसह ठाणे, भिवंडी, पालघर, औरंगाबाद आणि नंदुरबारकडे जाणारी बस सेवा बंद झाली आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे; तर श्रावणात त्र्यंबकेश्‍वरला परिक्रमा मारण्यासाठी जाणारे वारकरी आणि भाविकांचा हिरमोड झाला आहे. तसेच नाशिक, वणी आणि शिर्डी या तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या नागरिकांना जाणे जिकिरीचे झाले आहे. 

कोसळलेला डोंगर काढून, रस्ता मोकळा करण्यासाठी मशिनरी कामाला लावल्या आहेत; मात्र दरड मोठी असल्याने, रस्ता सुस्थितीत असेल की नाही याबाबत शंका आहे. रस्ता कधी मोकळा होईल, याचा निश्‍चित कालावधी सांगता येऊ शकत नाही. तेथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने घटनास्थळी पोहचू शकलो नाही. 
दिलीप बाविस्कर, उप-अभियंता, सार्वजनिक बांधकाम, उप-विभाग मोखाडा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mountain collapses in Aamla ghat at Mokhada near Mumbai