मुंबईचे वन्य जीवन आता रुपेरी पडद्यावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

अडीचशेहून जास्त प्रकारचे पक्षी, 40 हून अधिक प्रकारचे प्राणी, 5000 प्रजातींचे जीवजंतू, समुद्री जीवन, किनारे, गुंफा, फुलझाडे, कांदळवन असे मुंबईचे वैभवशाली वन्यजीवन जगासमोर येणार आहे

मुंबई : अडीचशेहून जास्त प्रकारचे पक्षी, 40 हून अधिक प्रकारचे प्राणी, 5000 प्रजातींचे जीवजंतू, समुद्री जीवन, किनारे, गुंफा, फुलझाडे, कांदळवन असे मुंबईचे वैभवशाली वन्यजीवन जगासमोर येणार आहे. महापालिकेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या या चित्रपटाचा "टीझर' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 21) प्रकाशित केला. दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात झालेल्या या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

मह्त्वाची बातमीमाहुलमधील 300 कुटुंबियांसाठी सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय 

दिवस-रात्र धावणाऱ्या मुंबईतील जैववैविध्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. या पार्श्‍वभूमीवर मुंबईचे वन्यजीवन जगासमोर आणण्यासाठी महापालिकेने चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे पर्यटनाला चालना मिळावी हा उद्देशही आहे. "कर्नाटक वाईल्ड' हा चित्रपट बनवणारे अमोघ वर्षा हेच मुंबईच्या वन्यजीवनावर चित्रपट साकारणार आहेत. आपण आतापर्यंत मुंबईत फक्त चटई क्षेत्राकडे लक्ष दिले. आता या चित्रपटातून मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य दिसेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

जंगलाची आवड असणारे आयुक्त मुंबई महापालिकेला प्रवीण परदेशी यांच्या रूपाने मिळाले आहेत, असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले. या वेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर ऍड्‌. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राहुल नार्वेकर, अभिनेत्री दिया मिर्झा, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते. 

महत्वाची बातमी ः भीषण : दिल्ली हैद्राबादनंतर मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार.. 

मुंबई स्वच्छ-सुंदर ठेवण्यात महापालिकेचे योगदान मोठे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. या वेळी मुंबई स्वछ ठेवणाऱ्या सफाई कामगारांवर आधारित लघुपट दाखवण्यात आला. चित्रपटाच्या माध्यमातून "वाईल्ड मुंबई' जगाला कळेल. त्याचे साक्षीदार असल्याबद्दल आपण स्वत:ला भाग्यवान समजतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

राणीच्या बागेत निसर्ग परिचय केंद्र 
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात निसर्ग परिचय केंद्र सुरू करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली. त्या ठिकाणी मुंबईची जैवविविधता आणि संस्कृतीचे दर्शन घडेल. अजमेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनात मुंबईची सांस्कृतिक परंपरा आणि जैवविविधतेचे दर्शन घडवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: movie on mumbai wildlife story