esakal | खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई महापालिकेविरुद्ध थोपटले दंड
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai_municipal_corporatio

आजपर्यंत नऊशे कोविड रुग्णांना बरे करणारे पावनधाम केंद्र फक्त भाजप कार्यकर्ते चालवतात म्हणून ते महापालिकेला नको आहे का, असे असेल तर ते महापालिकेने चालवावे. केंद्रचालकांनीही ते चालवायचे असेल तर तसे ठरवावे, कोणीही तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही, असे सांगत उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी महापालिकेविरुद्ध दंड थोपटले आहेत. 

खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई महापालिकेविरुद्ध थोपटले दंड

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : आजपर्यंत नऊशे कोविड रुग्णांना बरे करणारे पावनधाम केंद्र फक्त भाजप कार्यकर्ते चालवतात म्हणून ते महापालिकेला नको आहे का, असे असेल तर ते महापालिकेने चालवावे. केंद्रचालकांनीही ते चालवायचे असेल तर तसे ठरवावे, कोणीही तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही, असे सांगत उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी महापालिकेविरुद्ध दंड थोपटले आहेत. 

टाळेबंदीमुळे सध्या बंद असलेल्या कांदिवलीच्या पावनधाम जैन उपाश्रयात हे साठ खाटांचे केंद्र पोयसर जिमखाना, भाजप व पावनधाम यांच्यातर्फे चालविले जात आहे. स्वयंसेवी संस्थांनी चालवलेले मुंबईतील पहिले विलगीकरण केंद्र म्हणून ते प्रसिद्धीस आले होते व केंद्र सरकारनेही या केंद्राची प्रशंसा केली होती. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्याचे कारण देऊन महापालिकेने नुकतेच हे केंद्र बंद करण्याची व तेथील रुग्ण अन्य महापालिका रुग्णालयांमध्ये हलविण्याची नोटिस दिली आहे. त्याबाबत शेट्टी यांनी 'सकाळ' शी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. 

या केंद्राचा परिसरातील लोकांना पुष्कळ फायदा होत असल्याने ते सुरुच रहावे, असे माझे मत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी हे केंद्र चालवू नये असे महापालिकेला वाटत असेल तर पालिकेने ते स्वतः चालवावे. त्यापोटी महापालिकेकडून काहीही भाडे घेतले जाणार नाही, येथील सर्व सुविधा महापालिकेला निःशुल्क दिल्या जातील. तशा आशयाचे पत्रही केंद्रातर्फे महापालिकेला देण्यात आले, मात्र त्याचे उत्तरही आले नाही. या केंद्रासाठी आयोजकांनी आतापर्यंत स्वतःच्या खिशातून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च केले आहेत व यापुढेही हा खर्च आम्ही करत राहू, असेही शेट्टी यांनी 'सकाळ' ला सांगितले. 

पालिकेने ही नोटीस दिल्यावर हे केंद्र बंद करण्याचा निर्णय पावनधामतर्फे घेण्यात आला. पावनधामच्या विश्वस्तांना हे केंद्र चालवायचे नसेल तर ठीक आहे, जागा त्यांची असल्याने आम्ही या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र त्यांना हे केंद्र यापुढे सहा महिने जरी चालवायचे असले तरी त्यांनी ते चालवावे. त्यांना अडवण्याची कोणतीही ताकद महापालिकेत किंवा अन्य कोणामध्ये नाही, यासंदर्भात सर्व व्यवस्था मी करेन, अशी हमी देऊन शेट्टी यांनी महापालिकेविरुद्ध दंड थोपटले आहेत.

खरे पाहता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसे या केंद्रात येऊन येथील डॉक्टर - नर्स आदींचा सत्कार केला होता, तशीच शाबासकी महापालिका आयुक्तांनीही देणे गरजेचे आहे. केंद्र बंद करण्याच्या नोटिसा देणाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी. हे केंद्र बंद करण्याविरोधात सर्व लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top