खासदार राजन विचारे यांनी वाचला समस्यांचा पाढा

खासदार विचारे यांनी आयुक्त मिसाळ यांची भेट घेतली
खासदार विचारे यांनी आयुक्त मिसाळ यांची भेट घेतली

नवी मुंबई : नवी मुंबईतील विकास कामांसंदर्भात खासदार राजन विचारे यांनी नुकतीच महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. यावेळी केंद्र शासनाच्या फेम योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ३० इलेक्‍ट्रिक बसपैकी २० बसेस या एनएमएमटीच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत. या बसचा लोकार्पण सोहळा केंद्रीय अवजड उद्योगमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. 

जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर नवीन उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करावे. नेरूळ पूर्व-पश्‍चिम भागात जोडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाचे पुनर्बांधणी काम लवकर सुरू व्हावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. याशिवाय ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असलेला घणसोली, ऐरोली या पाम बीच रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. ऐरोली-मुलुंड मार्गावरील गरम मसाला हॉटेलसमोर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी याठिकाणी पादचारी पूल किंवा अंडरपास बनविण्याचे नियोजन करावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली. 

या वेळी विचारे यांनी वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. सानपाडा सेक्‍टर १० मधील सेन्सरी गार्डन उभारून तीन महिने उलटल्यानंतरही उद्‌घाटनास विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. या वेळी खासदार राजन विचारे यांच्यासोबत जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, अतुल कुलकर्णी, सतीश घोसाळकर, उपशहर प्रमुख जितेंद्र कांबळे, प्रदीप वाघमारे, नगरसेवक एम. के. मढवी, काशिनाथ पवार, माजी परिवहन सदस्य विसाजी लोके आदी उपस्थित होते. या समस्यांबाबत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सकारात्मक भूमिका घेत सर्व मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल, असे सांगितले.

वाशी रुग्णालयात एमआरआय सुविधा हवी
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात एमआरआय सुविधा तत्काळ सुरू करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्त मिसाळ यांच्याकडे केली. याशिवाय रुग्णालयातील मोडलेले सामान जसे की स्ट्रेचर, व्हीलचेअर, टेबल बदलण्यात यावेत. रक्त, लघवी, कफ, संडास अशा विविध प्रकारच्या चाचण्या रुग्णांना बाहेरून खासगी लॅबमधून कराव्या लागतात. या सर्व चाचण्या रुग्णालयातून करून घेण्यासाठी सुसज्ज अशा स्वतंत्र लॅबची निर्मिती करण्यात यावी. रुग्णालयात ब्रेन, चेष्ट, दंत, डोळे, हाड, त्वचा यांचे निदान करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात यावी. रुग्णांना रुग्णालयातून गोळ्या, औषधे, इंजेक्‍शन आणि इतर लागणारे तत्सम आवश्‍यक वैद्यकीय गोष्टी मोफत पुरवण्यात याव्यात, अशा मागण्या केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com