MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

कृष्ण जोशी
Thursday, 21 January 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष सतीश गवई यांचा राजिनामा सरकारने घ्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. 

मुंबई  ः मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील वळणावर आला असताना आणखीन गुंतागुंत वाढविणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष सतीश गवई यांचा राजिनामा सरकारने घ्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. मात्र त्यापूर्वीच मराठा आरक्षणाचा लाभ घेऊन विविध पदांवर कित्येक मराठा उमेदवारांनी यश मिळवले होते. पण त्या जागांसाठी पुन्हा नव्याने जाहिराती द्याव्यात अशी मागणी करणारा अर्ज एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात केला. हा अर्ज आता मागे घेण्यात येणार असला तरीही आयोगाने हा अर्ज सरकारला न विचारता केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या हिताविरोधी असा अर्ज दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकात म्हटले आहे. 

एकीकडे मराठा आरक्षणावर स्थगिती आली असताना राज्य सरकारच्या विविध विभागांकडून रोज नवी नोकरभरती जाहीर करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यात पुन्हा आंदोलने सुरु झाली असून अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलने होत आहेत. एसईबीसी कोट्यातून अंतर्गत निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अंतिम आदेश न मिळालेले मराठा उमेदवार आझाद मैदानात आंदोलन करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची सुनावणी राज्य सरकारच्याच मागणीनुसार लांबणीवर गेली आहे. त्यामुळे सामान्य मराठा तरुण हवालदिल झाले असताना आरक्षणासाठी एका तरुणाने संभाजीनगर येथे आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. अशा स्थितीत एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात वरील अर्ज करून आगीत तेल ओतण्याचे काम केले, अशीही टीका पत्रकात करण्यात आली आहे. 

मुंबई, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वीसुद्धा मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांमुळे मराठा समाजाच्या मुलांचे वारंवार नुकसान करण्यात आले होते. त्यात भर म्हणून एमपीएससी ने मराठा उमेदवारांना हानीकारक असा अर्ज करून समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांचा सरकारने तत्काळ राजिनामा घ्यावा, अशी मागणीही मोर्चातर्फे करण्यात आली आहे. अन्यथा मराठा क्रांती मोर्चातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्यास सर्वस्वी सरकारच जबाबदार राहील, असेही पत्रकात म्हटले आहे. विरेंद्र पवार, विनोद साबळे, अंकुश कदम, प्रशांत सावंत, रमेश आंब्रे, मंदार जाधव, अभिजीत पाटील यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

MPSC chairperson should resigns Demand of Maratha Kranti Morcha

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC chairperson should resigns Demand of Maratha Kranti Morcha