esakal | महावितरणची थकबाकी वाढली, पाच महिन्यात थकबाकी गेली 5 हजार 742 कोटींवर
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणची थकबाकी वाढली, पाच महिन्यात थकबाकी गेली 5 हजार 742 कोटींवर

कोरोनाच्या कालावधीत महावितरणने वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवली. बिलाच्या रक्कमेत सवलत देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आल्याने ग्राहकांनी वीज बिल भरलेली नाहीत.

महावितरणची थकबाकी वाढली, पाच महिन्यात थकबाकी गेली 5 हजार 742 कोटींवर

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई :  कोरोनाच्या कालावधीत महावितरणने वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवली. बिलाच्या रक्कमेत सवलत देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आल्याने ग्राहकांनी वीज बिल भरलेली नाहीत. यामुळे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत महावितरणची थकबाकी तब्बल 5 हजार 742 कोटींवर पोहचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 3 हजार 521 कोटींची थकबाकी ही घरगुती वीज ग्राहकांकडे आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणने वीज मीटरचे रिडींग घेतले नाही. यावेळी ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठविण्यात आली. एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत महावितरणने घरगुती वीज ग्राहकांना 8 हजार 949 कोटींची वीज बिले पाठवली. त्यापैकी 8 हजार 107 कोटींची बिले ग्राहकांनी जमा केली. यंदा याच कालावधीत महावितरणने 9 हजार 10 कोटींची बिले ग्राहकांना पाठवली. त्यापैकी 5 हजार 489 कोटीची रक्कम ग्राहकांनी जमा केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणने भरमसाठ बिले दिल्याने नागरिकांकडून प्रचंड विरोध झाला. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने वीज बिलात सवलत देण्याचा विचार केला. मात्र त्यावर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.

महत्त्वाची बातमी : उदय सामंत यांची सुरक्षा वाढवली, धमक्यांचे फोन आल्यानंतर देण्यात आली Y अधिक एस्कॉर्टस सुरक्षा

गेल्या पाच महिन्यांत राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना 10 हजार 372 कोटींची वीज बिले दिली होती. त्यापैकी 8 हजार 882 कोटी रुपयांची बिले ग्राहकांनी भरली आहेत. गत वर्षी ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक अस्थापनांना पुरविल्या जाणाऱ्या विजेची मागणी 644 दशलक्ष युनिट होती. यंदा ऑगस्ट महिन्यांत विजेच्या मागणीत 429 दशलक्ष युनिटपर्यंत वाढ झाली आहे. यंदा मे महिन्यांत या मागणीने 190 दशलक्ष युनिटपर्यंत तळ गाठला होता.

व्यावसायिक अस्थापनांचा वीज वापर 34 टक्केनी कमीच

अनलॉकच्या विविध टप्प्यामध्ये सरकारने व्यावसायिक अस्थापनांना परवानगी दिली आहे. असे असली तरी अद्याप विजेच्या क्षमतेत पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे या क्षेत्रातील विजेची मागणी 34 टक्क्यांनी कमीच आहे. गेल्या पाच महिन्यांत या अस्थापनांना 2 हजार 677 कोटींची बिले देण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 946 कोटींची बिले या व्यावसायिकांनी भरली आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

MSEDCL arrears increased to Rs 5742 crore in last five months amid lockdown

loading image
go to top