esakal | Mumbai : थकीत वसुलीसाठी मालमत्तांचा लिलाव?
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

Mumbai : थकीत वसुलीसाठी मालमत्तांचा लिलाव?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावाबाबत आठवडाभरात निर्णय होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने यासाठी कृती आराखडा तयार केला असून त्याला आठवडाभरात प्रशासकीय मंजुरी मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेने गेल्या वर्षी थकीत मालमत्ता कर जप्त करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबले होते. महापालिकेचा १५ हजार कोटींच्या आसपास थकीत मालमत्ता कर आहे, तर गेल्या वर्षात महापालिकेने ११ हजार ६६१ मालमत्ता जप्त केल्या. त्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे अधिकार मिळण्यासाठी महापालिकेने कायद्यात तरतूदही करून घेतली, तर आता मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कृती आराखड्याचा मसुदा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात त्याला प्रशाकीय मंजुरी मिळेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे पालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी सांगितले.

हेलिकॉप्टर आणि ५० वाहनेही जप्त

महापालिकेने थकबाकीदारांच्या ११ हजार ६६१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यातील सर्वाधिक मालमत्ता या एच-पूर्व अर्थात वांद्रे-सांताक्रूझ प्रभागातील दोन हजार ०५३ मालमत्ता आहेत. जप्त मालमत्तांमध्ये प्रामुख्याने इमारती, भूखंड, कार्यालयांचा समावेश आहे. त्याचबरोबर पालिकेने हेलिकॉप्टर, ५० वाहने, संगणक, वातानुकूलित प्रणाली अशा वस्तूही जप्त केल्या आहेत.

अशी होईल प्रक्रिया

  • प्रभाग पातळीवर नियोजन करण्यात येईल.

  • मालमत्तांच्या बाजारभावानुसार बोलीचा दर ठरवला जाईल.

  • संबंधित मालमत्तांवर इतर संस्थांचीही थकबाकी असण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी सार्वजनिक जाहिरात प्रसिद्ध करून माहिती घेतली जाईल.

  • इतर संस्थांकडून आक्षेप आल्यास त्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल.

  • प्रत्यक्ष लिलावाच्या प्रक्रियेसाठीही सार्वजनिक जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

loading image
go to top