कर्करोगाच्या रुग्णांची कोरोनावर मात, 300 हून अधिक कर्करोगग्रस्त कोरोनातून बरे

भाग्यश्री भुवड
Wednesday, 19 August 2020

बईत कर्करोगाच्या रुग्णांवर कोरोनाचा जास्त परिणाम होत नसून ते ठणठणीत बरे होऊन कोरोनावर मात करत आहे.एनएससीआय डोममधून 345 जणांवर यशस्वी उपचार केले गेले आहेत.

मुंबईः एकीकडे मुंबईसह देशभरात कोरोनामुळे होणाऱ्या  मृत्यूंची संख्या जास्त आहे. मात्र यातही एक दिलासादायक बाब आहे ती म्हणजे आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग होऊनही एकाही कर्करोग ग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही. याचा अर्थ मुंबईत कर्करोगाच्या रुग्णांवर कोरोनाचा जास्त परिणाम होत नसून ते ठणठणीत बरे होऊन कोरोनावर मात करत आहे. जगात आतापर्यंत 30 टक्के कर्करोगग्रस्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कर्करोगग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य रुग्णापेक्षा आधीच कमी असते. त्यामुळे, त्यांना कोरोनाचा धोका सर्वाधिक असतो. मात्र, मुंबईत कर्करोगाने त्रस्त असलेले रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करत आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यानंतर कर्करोगाच्या रुग्णांवर कुठे उपचार करायचे?  असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, यावर उपाय म्हणून वरळीच्या एनएससीआय या कोविड डोम केद्रांत कोरोनाची लागण झालेल्या कर्करोगग्रस्त रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू केले गेले. मुंबईत कर्करोग बाधित कोरोना रुग्णांवर उपचार करणारे एनएससीआय डोम हे एकमेव केंद्र आहे.

हेही वाचाः नव्या पत्री पूलाबाबत महत्त्वाची अपडेट; आजपासून पुढील पाच दिवसांसाठी वाहतुकीत मोठा बदल

आतापर्यंत या एनएससीआय डोममधून 345 जणांवर यशस्वी उपचार केले गेले आहेत. त्यात 297 हे कर्करोगबाधित रुग्ण होते. तर, 18 कर्करोगबाधित रुग्णांचे नातेवाईक असून त्यांना ही कोरोनाची लागण झाली होती. तर, 48 जणांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत 31 कर्करुग्ण एनएससीआय केंद्रात कोरोनावरील उपचार घेत असल्याचे  एनएससीआय केंद्राचे कर्करोग कॉर्डिनेटर डॉ. यागनिक वाझा यांनी सांगितले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना टाटा रुग्णालयाचे टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक आणि व्हीओटीव्ही संस्थापक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितलं की, कोरोनाबाधित कर्करुग्णांना एनएससीआय डोममधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार केले जातात. सर्व प्रकारची ट्रिटमेंट त्यांना दिली जाते. औषधांसह समुपदेशन ही रुग्णांचे केले जाते. कोरोनामुळे आतापर्यंत एका कर्करुग्णाचा मुंबईत मृत्यू झालेला नाही. एनएससीआय केंद्रात रक्ताचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, तोंड आणि गळ्याचा कर्करोग आणि इतर कर्करुग्णांवर उपचार केले जात आहे. आतापर्यंत सर्व कर्करुग्णांवर मोफत उपचार केले गेले आहेत.

कोरोनासह समुपदेशनाचाही डोस

पालिकेच्या आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कर्करोग हा गंभीर आजारांमध्ये येतो. त्यामुळे, जोपर्यंत कोरोना रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर केंद्रात उपचार केले जातात. रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमी असल्याकारणाने त्यांची टेस्ट निगेटिव्ह यायला किमान 4 ते 6 आठवडे लागतात. त्यामुळे, त्यांच्यावर पूर्ण उपचार होईपर्यंत त्यांना सोडले जात नाही. या सर्व प्रक्रियेदरम्यान अनेक रुग्णांना मानसिक ताण येतो. त्यामुळे, टाटा रुग्णालयातर्फे त्यांचे समुपदेशन ही केले जाते.  याशिवाय, एनएससीआय डोममध्ये योगा आणि व्यायाम, फिजीओथेरेपीचा उपक्रम ही राबवला जातो. अशा आतापर्यंत जवळपास 40 रुग्णांचे टेलिफोनिक समुपदेशन केले गेले आहे. अशा रुग्णांवर उपचार तर आहेच पण, मानसिक आधार देणं फार महत्त्वाचे असल्याचे टाटा स्मारक कर्करोग रुग्णालयाच्या वैद्यकीय समाजसेवक सुनिता जाधव यांनी सांगितले आहे. 

अधिक वाचाः लालबागचा राजा मंडळाची कौतुकास्पद कामगिरी; आरोग्योत्सवात मोठ्या संख्येने प्लाझ्मादान

आम्ही त्यांच्या मातृभाषेत बंगाली, ओरीया, मराठी, हिंदी या भाषेत समुपदेशन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. कारण, बहुतांश रुग्ण हे महाराष्ट्राबाहेेरुन येत आहेत. त्यांना त्यांच्या चिंता मुक्तपणे व्यक्त करता यावी आणि अधिक चांगल्याप्रकारे मदत करता यावी यासाठी प्रयत्न केले जातात. घरापासून दूर असल्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवतो. मात्र,  समुपदेशनामुळे त्यांना लढा देण्यास मदत होते. कोरोना हा आजार नवा असल्याकारणाने रुग्णांच्या नातेवाईकांनाही याबाबतची माहिती द्यावी लागते, असं टाटा स्मारक कर्करोग रुग्णालयाचे वैद्यकीय समाजसेवक सुनिता जाधव यांनी सांगितलं.

काय आहे प्रक्रिया ?

लॉकडाऊनच्या आधी अनेक कर्करोग रुग्ण उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले होते. यांच्यापैकी अनेकांकडे राहण्यासाठी जागा ही उपलब्ध नव्हती. त्यामुळे, पालिका आणि टाटा रुग्णालयाने मिळून अशा रुग्णांसाठी वरळीच्या एनएससीआय केंद्रात त्या रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून आतापर्यंत एकही कर्करोगग्रस्त रुग्ण दगावलेला नाही. टाटा रुग्णालयात कर्करोगावर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णाची आधी कोरोना चाचणी केली जाते. ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्या रुग्णाला आधी कोरोनाच्या उपचारांसाठी एनएससीआय डोममध्ये पाठवले जाते आणि निगेटिव्ह आल्यास त्यांच्यावर तात्काळ टाटा रुग्णालयात उपचार सुरू केले जातात. जो पर्यंत या रुग्णाची कोरोना दुसरी चाचणी निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीवर उपचार केले जातात. शिवाय, कर्करोगावर लागणारी औषधे ही या उपचारादरम्यान दिली जातात. 

(संपादनः पूजा विचारे) 

Mumbai 300 Cancer patients overcome corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai 300 Cancer patients overcome corona