esakal | मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होतेय, पण...

बोलून बातमी शोधा

covid

थोडी चिंता वाढवणारी बातमी

मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होतेय, पण...
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होतोय ही चांगली बाब आहे. पण एप्रिल महिन्यात वाढलेला मृत्यूदर ही चिंताजनक बाब आहे. मृत्यूदर तब्बल २०० टक्क्यांनी वाढला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनामुळे १६६ मृत्यू झाले होते, तेच शेवटच्या आठड्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण ४९० आहे. संपूर्ण मार्च महिन्यात कोरोनामुळे २१५ मृत्यू झाले. तेच एप्रिल महिन्यात मृत्यूचे प्रमाण १४७९ आहे. म्हणजे सातपट जास्त आहे.

"मृत्यूचे जे प्रमाण जास्त आहे, त्यामागे काय कारणे आहेत, याचा आम्ही राज्यातील टास्क फोर्समधील तज्ञ्ज्ञांच्या मदतीने, अभ्यास करतोय" असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ०.२४ टक्के मृत्यूदर होता. दुसऱ्या आठवड्यात ०.४६ टक्के, तिसऱ्या आठवड्यात ०.६३ टक्के आणि चौथ्या आठवड्यात १.२७ टक्के होता.

हेही वाचा: 'ब्लेम गेम मध्ये जनतेचाच गेम होतोय', मनसेचा निशाणा

केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. अविनाश सुपे हे कोविड मृत्यू ऑडिट कमिटीचे प्रमुख आहेत. कोरोनामुळे मृत्यूदर वाढल्याचे त्यांनी मान्य केले. पुढचे काही दिवस हे प्रमाण असेच राहील असे त्यांनी सांगितले. "आपण पाहतोय, पुढचे काही आठवडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत जाईल. मृत्यूदरही हळूहळू कमी होईल पण त्याला काही वेळ लागेल" असे सुपे यांनी सांगितले.

हेही वाचा: 'नाहीतर या देशामध्ये फक्त मुडद्यांचं राज्य राहील'

एप्रिलच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मृत्यूचे प्रमाण जास्त राहील असा अंदाज होता. कारण पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात अनुक्रमे ६८,१६५ आणि ६२,१५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. "पेशंटच्या प्रकृतीत सुधारणा होण्यापूर्वी किंवा मृत्यूपूर्वी तो जास्तीत जास्त १४ दिवस आयसीयूमध्ये असतो. रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्यानंतर मृत्यूदर वाढतो. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूदर जास्त आहे" असे साथरोग तज्ञ्ज्ञ गिरीधरा बाबू यांनी सांगितले. १० टक्के मृत्यू हे ४५ वर्ष वयोगटाच्या आतील आहेत, असे डॉ. सुपे म्हणाले.