मुंबईत बाळासाहेबांच्या शिवसेनेकडूनही नाईट लाईफची संकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai night life

मुंबईतील नाईट लाईफ याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात चर्चेला आली होती. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारामुळे मुंबईतील नाईट लाईफच्या वेळेचा विषय चांगलाच गाजला होता.

Mumbai Night Life : मुंबईत बाळासाहेबांच्या शिवसेनेकडूनही नाईट लाईफची संकल्पना

मुंबई - मुंबईतील नाईट लाईफ याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात चर्चेला आली होती. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारामुळे मुंबईतील नाईट लाईफच्या वेळेचा विषय चांगलाच गाजला होता. आता बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातूनही मुंबईत नाईट लाईफसाठी पुढाकार घेण्यात येणार आहेत. मुंबईतील फॅशन स्ट्रीट, बाणगंगा परिसर, कालाघोडा यासारख्या भागात उशिरापर्यंत शॉपिंग आणि खानपान व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा मानस मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्र दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेकडून आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी मुंबईच्या रात्रीच्या वेळेतील सोयी सुविधांबाबत बोलून दाखवले. त्यासाठीच मुंबई पोलीस आयुक्तांसोबत येत्या दिवसांमध्ये बैठक घेऊन चर्चा करू असेही ते म्हणाले.

मुंबईतील फॅशन स्ट्रीटसारख्या ठिकाणी ग्राहकांना उशिरापर्यंत खरेदीचा पर्याय मिळायला हवा. त्यासोबतच परिसरात खाण्याची अतिरिक्त काही सुविधा उपलब्ध करून देता येते का? याबाबतचीही व्यवस्था होणे गरजेचे आहे. काला घोडा फेस्टिव्हल हा वर्षातून एकदाच होतो. परंतु या फेस्टिव्हलसारखी व्यवस्था रोज उपलब्ध करून देता येते का ? हे पाहणेही महत्वाचे आहे. मुंबईत फॅशन स्ट्रीट, काला घोडा परिसर तसेच बाणगंगा परिसरात रात्रीच्या वेळी शुकशुकाट असतो. त्यामुळेच अशा ठिकाणी काही सुविधा उपलब्ध करून देऊन पर्यटकांच्या दृष्टीने सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

मुंबईच्या कोळ्यांच्या जेवणाचा आस्वाद हा एरव्ही फक्त फुड फेस्टीव्हलमध्ये घेता येतो. त्यामुळेच मुंबईचे कोळीवाडे हे पर्यटकांच्या दृष्टीने स्वच्छ आणि सज्ज केले जाणार आहेत. त्यामधून कोळी बांधवांसह स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्यासाठी चालना मिळेल. मुंबईत इतर ठिकाणी फॅशन स्ट्रीट, बाणगंगा परिसर आणि कालाघोडा परिसराच्या ठिकाणी रात्री १२ वाजेपर्यंत ही ठिकाणे सुरू ठेवता येतील का? याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्यासोहबत चर्चा करणार आहे.

उशिरापर्यंत काही सेवा देता येतात का याबाबतची चाचपणी करण्यासाठीच या भेटीत चर्चा होईल, असे केसरकर यांनी सांगितले. आमची संकल्पना ही नाईट लाईफची नाही. नाईट लाईफ ही मुळात श्रीमंतांची संकल्पना आहे. आमचे सरकार हे सर्वसामान्य आणि गरीबांचे सरकार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी उशिरापर्यंतच्या सेवा देऊन त्यामधून सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हाच आमच्या संकल्पनेचा गाभा असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.