बेस्ट कर्मचारी पुन्हा संपावर जाणार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे... 

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कर्मचारी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर जातील, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेत समाविष्ट करावा, वेतन करार, निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी, मार्च २०१६ मध्ये मुदत संपलेला वेतन करार पुन्हा करावा, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. 

यापूर्वी ९ जानेवारीला सुरू झालेला संप ९ दिवस चालला होता. न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर संघटनांनी संप मागे घेतला; त्यावेळी बेस्ट प्रशासनाने मागण्यांची पूर्तता करण्याबाबत आश्‍वासन दिले होते. त्यानंतर एकदाही बेस्ट प्रशासनाने युनियनला बैठकीसाठी बोलावले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याने ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला, असे राव यांनी सांगितले. 

प्रशासनासमोर तोडगा काढण्याचे आव्हान
७ ऑगस्टला बेस्ट दिन आहे, दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला होता. आताही ६ ऑगस्टचा संप टाळण्यासाठी प्रशासनाने तोडगा काढावा अन्यथा संप निश्‍चित आहे, असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Best Staff is on strike from 6 August