Mumbai BMC Budget: आरोग्य सेवा होणार आणखीन बळकट, कोट्यवधींची तरतूद

समीर सुर्वे
Wednesday, 3 February 2021

मुंबई महानगर पालिकेने आगामी आर्थिक वर्षांसाठी आरोग्य विभागासाठी 1 हजार 206 कोटी 14 लाख रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबई: मुंबई महानगर पालिकेने आगामी आर्थिक वर्षांसाठी आरोग्य विभागासाठी 1 हजार 206 कोटी 14 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यात शहरातील 1 कोटी नागरिकांना कोविड लस देण्यापासून रुग्णालयांचा विस्तार, नवे वैद्यकिय अभ्यासक्रम, ओपीडी ऑन व्हिल तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या घर बसल्या चाचण्या अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशी घोषणा 2021-22 च्या अर्थसंकल्पात आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केली.

कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सुपर स्पेशालिटी विंग आणि नाहूर येथे मल्टीस्पेशालिटी क्लिनीक उभारणीसाठी आराखडा बनविण्याचे काम सुरु आहे.

सीटीस्कॅन आणि एमआरआय अशा सुविधा मुख्य रुग्णालयात वाढविण्यात येणार आहे. परळ येथील केईएम आणि नायर रुग्णालयात एमआरआय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याच बरोबर लोकमान्य टिळक, केईएम आणि नायर रुग्णालयात तीन अत्याधुनिक सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यासाठी 17 ते 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर गोवंडी शताब्दी आणि कुर्ला भाभा रुग्णालयात पीपीई मॉडलव्दारे दोन सीटीस्कॅन मशिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

सध्या कोविडच्या लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु आहे. मात्र मुंबईतील 1 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महानगर पालिकेने ठेवले आहे. त्यासाठी नियोजन सुरु करण्यात आले आहे. पालिकेचे 29 रुग्णालये, 287 आरोग्य केंद्र आणि दवाखाने तसेच 28 प्रसुतीगृहांच्या दुरुस्तांचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 822 कोटी 72 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील दोन वर्षात ही कामे पूर्ण होणार आहेत.
 
नवे अभ्यासक्रम

सहा उपनगरी रुग्णालयात मेडिसीन, जनरल सर्जरी,स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्र, बालरोगशास्त्र, ऑर्थेपेडिक, नाक कान घसा अशा विविध विभागांमध्ये 86 डीएनबी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी 23 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर,आयुष्यमान भारत आणि विविध योजनांच्या माध्यमातून ही रक्कम परत मिळू शकते. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कुर्ला येथील भाभा, घाटकोपर येथील राजावाडी,गोवंडी येथील शताब्दी,कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सांताक्रुझ येथील देसाई आणि वांद्रे भाभा या रुग्णालयात हे अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. त्यातून अतिविशेष सेवांसाठी डॉक्टर उपलब्ध होतील. त्याचबरोबर पालिकेच्या नर्सिंग स्कूलचे रुपांतर नर्सिग महाविद्यालयात करुन बी.एससी नर्सिंग अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकिय पदवीअभ्यासक्रमाच्या जागांमध्येही वाढ करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक आणि विलेपार्ले हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकिय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा 150 वरुन 200, परळ येथील जीटी महाविद्यालयातील 180 जागा 250 आणि नायर रुग्णालय मेडिकल महाविद्यालय 120 जागा 150 करण्यात आल्या आहेत.

 ज्येष्ठ नागरिकांचा घरपोच आरोग्य व्यवस्था

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग अशांना घरातच आरोग्य सेवा आणि सल्ला देण्यासाठी फिरते दवाखाने सुरु करण्यात येणार आहे. शहर, पूर्व उपनगर आणि पश्‍चिम उपनगर असे प्रत्येकी 1 दवाखाना सुरु करण्यात येणार आहे.  त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य चाचण्याही घरात करता येणार आहे. युनानी, आयुर्वेद या सारख्या इतर उपचार पध्दतीचा वापरण्याचाही विचार आहे. यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
 100 वर्षांपूर्वी प्लेगसाठी तयार करण्यात आलेल्या कस्तुरबा रुग्णालयात कोविडनंतर विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी नवी इमारती बांधण्यात येणार आहे. लवकरच यासाठी निवीदा प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी नमूद केले. 

हेही वाचा- BMC Budget: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

डॉक्टर भरतीचा डोस

उपनगरात डीएनबी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी वैद्यकिय शिक्षकांची 172 कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मुख्य रुग्णालयात डॉक्टरांच्या भरतीलाही प्राधान्य देण्यात येत आहे.

  • भगवती रुग्णालय पुनर्विकास - 75 कोटी
  • शिव रुग्णालय परीसराचा पुनर्विकास - 75 कोटी
  • कर्करोग रुग्णालय प्रोटॉन थेरपी - 2 कोटी
  • अग्रवाल रुग्णालयाचा विस्तार -75 कोटी
  • नायर दंत रुग्णालय - 71.88 कोटी
  • गोवंडी शताब्दी रुग्णालयाचा विस्तार - 75 कोटी
  • केईएम रुग्णालयात प्लाझ्मा सेंटर - 20 कोटी
  • कुर्ला भाभा रुग्णालयाचा विस्तार - 20 कोटी

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai BMC Budget Vaccination 1 crore citizens 1 thousand 206 crore 14 lakh provision


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai BMC Budget Vaccination 1 crore citizens 1 thousand 206 crore 14 lakh provision